बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अनुपम खेर सध्या थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद लुटत आहे. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी चाहत्यांना स्वत: बद्दलची थोडी माहिती दिली आहे. त्यांचा हा मजेशीर अंदाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अनुपम यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम स्कूटर टॅक्सी घेऊन त्यांच्या मित्राला, अक्षय कुमारला भेटायला जात आहेत. दरम्यान त्यांनी अक्षय कुमार ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी थायलंडमध्ये असल्याचे सांगितले. ‘पटाया, थायलंडमध्ये काल रात्री केलेली मस्ती. माझ्या मित्राला, अक्षय कुमारला भेटण्यासाठी मी स्कूटर टॅक्सी केली. मी या सफरचा आनंद लुटला’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते.

‘मी माझ्या मित्राला, अक्षय कुमारला भेटायला त्याच्या हॉटेलवर जात आहे. पटायामध्ये अक्षय कुमार “सूर्यवंशी” चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. मी आणि माझा मित्र स्कूटर टॅक्सी घेऊन अक्षयला भेटायला जात आहोत. या सफरीचा मी आनंद घेत आहे. जर आता माझ्या डोक्यावर केस असते तर ते हवेशी गप्पा मारत असते. पण आता माझ्या डोक्यावर टोपी आणि हेलमेट आहे’ असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

अनुप खेर आणि अक्षय कुमार यांनी ‘स्पेशल २६’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘बेबी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आता अक्षय ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान अक्षयचे स्टंट करतनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री कतरिना कैफ तब्बल १० वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे.