अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मोदी सरकारने घेतलेल्या जवळपास प्रत्येक वादग्रस्त निर्णयाला ते सोशल मीडियाव्दारे जाहिर पाठिंबा देताना दिसतात. यावेळी अनुपम खेर यांनी मोदी सरकारची स्तुती करत सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “विरोधकांना शौचालयास कुठे जावे? हे समजाऊन सांगण्यासाठी दशकं लागली. परंतु CAA ला विरोध कसा करायचा हे त्यांना लगेच समजले.” अशा शब्दात त्यांनी CAA विरोधकांवर टीका केली.

काय म्हणाले अनुपम खेर?

अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमार्फत अनुपम खेर म्हणाले, “माझ्या देशातील काही लोक धन्य आहेत. गेल्या ७२ वर्षात त्यांना ट्रॅफिकचे नियम कसे पाळायचे कळले नाही. शौचालयास कुठे जावे त्यांना कळले नाही. गेल्या तीन वर्षात GST कसा भरावा कळले नाही. परंतु सुधारित नागरिकत्व कायदा त्यांना दोन दिवसांत समजला. NRC कायदा तर त्यांना येण्याआधीच समजला होता. अशा लोकांना काय योग्य व काय अयोग्य हे शिकवायला हवं.”

अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अनुपम खेर यांच्या विचारांना पाठिंबा दिला, तर काही विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला.