ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल माझी आई आहे असा दावा केरळमधल्या एका महिलेने केला. इतकंच नाही तर या महिलेनं कौटुंबिक न्यायालयात पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल करून ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली. या प्रकरणी आता अनुराधा पौडवाल यांनी संबंधित महिलेचे सर्व दावे फेटाळले आहेत. करमाला मोडेक्स या महिलेने केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसून ते निरर्थक आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अनुराधा पौडवाल यांच्या प्रवक्त्यांनीही याप्रकरणी माहिती दिली. “अनुराधा यांच्या मुलीचा जन्म १९७४ मध्ये झाला होता. त्यामुळे त्या महिलेनं केलेले दावे खोटे आहेत. संबंधित महिलेने याचिकेत अनुराधा यांच्या पतीचाही उल्लेख केला आहे. मात्र त्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. करमाला जर खरंच त्यांची मुलगी असेल तर त्यांनी अनुराधा यांना पैसे द्यावेत, त्यांच्याकडून पैशांची मागणी करू नये”, असं ते म्हणाले.

करमाला यांचे काय म्हणणे आहे?

करमाला यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “मला जन्म देणारी आई अनुराधा पौडवाल आहेत हे मला पाच वर्षांपूर्वी समजलं. माझ्या वडिलांनी त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी मला हे सत्य सांगितलं. मी चार दिवसांची होते त्यावेळी अनुराधा पौडवाल यांनी माझे पालक पोन्नाचन आणि अॅग्नेस यांच्याकडे सोपवले. माझे वडील लष्करात होते. अनुराधा पौडवाल यांचे ते चांगले मित्र होते. कालांतराने त्यांची बदली केरळमध्ये झाली. अनुराधा त्यावेळी आपल्या करिअरमध्ये व्यस्त होत्या आणि बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला अॅग्नेस यांच्याकडे सोपवले. वडिलांकडून त्यांच्या मृत्यूपूर्वी मी सत्य ऐकले. त्यानंतर अनुराधा पौडवाल यांच्याशी बऱ्याचदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.”