13 November 2019

News Flash

नवाज- अनुराग जोडी पुन्हा एकदा एकत्र, दिसणार या चित्रपटात

ही जोडी ऑफ स्क्रिन नव्हे तर आता ऑन स्क्रिन एकत्र दिसणार आहे

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांनी १९९९मध्ये ‘शूल’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटातील नवाजचे डायलॉग अनुराग कश्यपने लिहिले होते. त्यानंतर अनुराग आणि नवाज यांनी ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ आणि ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर २’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

अनुराग कश्यप नवाजुद्दीन सिद्दीकी ही जोडी ऑफ स्क्रिन नव्हे तर आता ऑन स्क्रिन एकत्र दिसणार आहे. नवाजच्या ‘बोले चुडिया’ या चित्रपटात अनुराग पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच मुंबई मिररसह झालेल्या एका संवादात अनुरागला चित्रपटाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर अनुराग ‘हो, मी चित्रपट करत आहे आणि आता मी इतकच सांगू सांगतो. पहिल्यांदा नवाजने मला काही तरी करायला सांगितले आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे’ असे अनुराग पुढे म्हणाला.

‘बोले चुडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शमास सिद्दीकी करणार असून या चित्रपटातून तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट एक रोमॅण्टिक ड्रामा असणार आहे. नवाजुद्दीन यामध्ये प्रियकराची भूमिका साकारणार आहे. वुडपिकर मुव्हिजचे राजेश भाटिया आणि किरण भाटिया या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. शमासने याआधी काही लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे.

First Published on June 25, 2019 4:13 pm

Web Title: anurag kashyap and nawazuddin siddiqui working together in bole chudiyan avb movie