दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेता रणवीर शौरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय. रणवीरच्या एका ट्विटवरून हा वाद सुरू झाला आहे. रणवीरने कोणाचंच नाव न घेता ट्विट केलं, ‘बॉलिवूडचे अनेक स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक आता मुख्य प्रवाहाच्या बॉलिवूडचे गुलाम झाले आहेत. हे तेच लोक आहेत जे सतत लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी शासनाबाबत खुलेपणाने बोलत असतात, जोपर्यंत त्यांना चमकत्या द्वारमधून बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळाला नव्हता. हा ढोंगीपणा आहे.’ रणवीरचं हे ट्विट वाचून अनुरागचा पारा चढला आणि त्याने रणवीरला उद्देशून प्रश्न विचारला.

‘रणवीर, तू खरंच असं समजतोस का? जर हो असेल तर जे म्हटलंस त्याचं स्पष्टीकरण दे. तुला नेमकं काय म्हणायचंय आहे? आणि कोण कोणाचा गुलाम बनलाय’, असे प्रश्न अनुरागने रणवीरला विचारलं. यावर रणवीरने उत्तर दिलं, ‘मला जे म्हणायचं आहे ते मी स्पष्ट बोलतो. मी जे काही लिहिलंय त्यात स्पष्टता नाही असं मला वाटत नाही. कोणाची नाव घेऊन मला चिखल उडवायचं काम नाही करायचंय. पण लोकांनी आपण कुठून आलो आहोत हे विसरू नये याची मी त्यांना आठवण करून देतोय.’

रणवीरच्या या उत्तराने संतप्त झालेल्या अनुरागने ट्विटरवर सर्वांची नावं घेऊन त्याने केलेल्या कामाचा पाढाच वाचला. ‘माझं घर बॉलिवूडमुळे चालत नाही. माझ्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोणी धर्मा, एक्सेल किंवा यशराज फिल्म्स किंवा इतर कोणता स्टुडिओ येत नाही. मला स्वत:ला नवीन कंपनी बनवावी लागते आणि ते मी स्वत:च करतो. कंगनाकडे जेव्हा काही काम नव्हतं तेव्हा ‘क्वीन’ चित्रपट बनवला होता. तनु वेड्स मनु चित्रपट जेव्हा रखडला होता तेव्हा आनंद रायची मदत केली होती आणि गुंतवणूकदारांची भेट करून दिली होती. वाटल्यास त्यांना विचारून घ्या. मी नावं घेऊन बोलतोय आणि जे खरं आहे ते बोलणारच’, अशा शब्दांत अनुरागने उत्तर दिलं.

अभिनेत्री कंगना रणौतनेही अनुरागला ‘मिनी महेश भट्ट’ म्हणून टोमणा मारला होता. बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींचा हा वाद सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे. याआधी घराणेशाहीच्या मुद्द्यावर कंगना रणौत, तापसी पन्नू व स्वरा भास्कर यांच्यात वाद झाला होता.