बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्म मेकर अनुराग कश्यप याने इंडिगोच्या विमान प्रवासावर बहिष्कार घातला आहे. मुंबईहून कोलकात्याला जाण्यासाठी त्यानं इंडिगोचा विमान प्रवास नाकारत पहाटे चार वाजता तब्बल ७ तासांच्या प्रतिक्षेनंतर विस्ताराच्या विमानानं प्रवास केला. इंडिगोच्या विमान प्रवासावर बहिष्कारामागचे कारणही त्यानं स्पष्ट केलं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात ट्विट करुन अनुराग कश्यपने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. अनुराग म्हणतो, “जोपर्यंत इंडिगो विमान कंपनी कुणाल कामरावरील बंदी हटवत नाही तोपर्यंत आपणही इंडिगोच्या विमानाने प्रवास करणार नाही. मला वाटतं की मी याबाबत काही करु शकत नाही. मी इंडिगोच्या विमानानं प्रवास न केल्यास त्यानं या कंपनीला काहीही फरक पडणार नाही. मात्र, मला हे जाणून घ्यायचं आहे की, कुणाल कामरानं काय चूक केली. उलट मी असा विचार केला की, मी इंडिगोच्या विमान प्रवासावर बहिष्कार घालू शकतो. त्यामुळे कोलकात्याला एका कार्यक्रमाला जाताना मी विस्ताराच्या विमानानं प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मला आयोजकांनी सांगितले की, विस्ताराच्या विमानाने जाण्यासाठी तुम्हाला सकाळी ४ वाजता उठावं लागेल. त्यावर मी पहाटे चार वाजता उठेन पण इंडिगोच्या विमानानं प्रवास करणार नाही, असं त्यांना सांगितलं.”

कुणाल कामरावर मुंबई ते लखनऊच्या विमान प्रवासात टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास दिल्याचा आरोप आहे. याचा एक व्हिडिओ स्वतः कामरानं आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला होता. तसेच यासोबत एक मजकूरही शेअर केला होता. यानंतर इंडिगोने कुणालवर ६ महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली.

कामरानं पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘आज मी लखनऊला जाताना विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. यावेळी त्यांना मी लोकांशी टीव्हीवर विनम्र स्वरुपात संवाद साधत जा असं सांगितलं. सुरुवातीला त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आपण फोनवर बोलत असल्याचं भासवलं. दरम्यान, मी त्यांचा फोन कॉल संपण्याची वाट पाहत होतो. यावेळी कामरानं अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारितेबाबतही आपलं मत मांडलं. त्यानं म्हटलं की, अर्णब यांनी माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी मला यापूर्वीच मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती म्हणून घोषित केलं आहे.