बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या रणबीर आणि अनुराग दोघेही चर्चेत आले आहेत. बी टाऊनमधल्या कपूर घराण्यातील रणबीर कपूर हा त्याच्या दिलखुलास अंदाजासाठी लोकप्रिय आहे. पण, रणबीरच्या करिअरचा आलेख पाहता त्याच्या वाट्याला काही फारसे चांगले चित्रपट आलेले नाहीत हे आपण नाकारु शकत नाही. रणबीरच्या करिअरच्या उतरत्या आलेखावर दिग्दर्शक अनुराग कश्यप फारच नाराज असून त्यासाठी ते स्वत:ला जबाबदार मानतो.
अनुरागचा भाऊ, अभिनव कश्यपच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘बेशरम’ या चित्रपटापासून रणबीरच्या वाट्याला अपयशाची झळ लागली आहे. त्याआधी रणबीरच्या वाट्याला ‘वेक अप सिड’, ‘बर्फी’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ यांसारखे गाजलेले चित्रपट आले होते. पण ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाने मात्र रणबीरच्या यशाचे चित्र बदलले. ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘बेशरम’ या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या अपयशामुळे रणबीरच्या करिअरवर परिणाम झाला आहे, हे मी जाणतो असे म्हणत मी यासाठी स्वत:ला जबाबदार मानतो असे अनुराग एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला.
‘माझ्या मते रणबीर हा एक उत्तम अभिनेता असून तो अभिनयात बरेच प्रयोग करण्यासाठी सक्षम आहे. पण त्याच्या अपयशासाठी कुठेतरी आम्ही सर्वच जबाबदार आहोत’, असंही अनुराग म्हणाला. ‘बेशरम’ आणि ‘बॉम्बे वेल्वेट’च्या अपयशानंतर विविध माध्यमांतूनही अनुराग आणि अभिनव या दोघांवरही अनेक माध्यमांतून टिका करण्यात येत होती. असे असले तरीही रणबीर आणि अनुराग यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर त्याचा तसूभरही परिणाम झालेला नाही हे नक्कीच. ‘आम्ही आजही तितक्याच अत्मियतेने बोलतो’ असेही अनुराग म्हणाला.
रणबीरसह यापुढे कोणताही चित्रपट करण्याचा प्लॅन आहे का असे विचारले असता ‘नाही, सध्यातरी तसे कोणतेही प्लॅन नाहीत’ असे अनुरागने स्पष्ट केले आहे. सध्यातरी रणबीर त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असून त्याच्याकडे येणाऱ्या दोन वर्षांत फारसा वेळ नसल्याचेही अनुरागच्या बोलण्यातून समजले. रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत असून फवाद खान, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा ही स्टारकास्ट या चित्रपटातून झळकणार आहे.