दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (JNU)रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी केवळ सामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आपली मते मांडताना दिसत आहेत. दरम्यान प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने सर्वांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची विनंती केली आहे.

काय म्हणाला अनुराग कश्यप?

अनुरागने ट्विटच्या माध्यमातून जेएनयूच्या विद्यार्थांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. “आज रात्री ८ ते १० दरम्यान मुंबईतील कार्टर रोड येथे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील (JNU) विद्यार्थांच्या समर्थनार्थ आम्ही आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल.” अशा आशयाचे ट्विट अनुरागने केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जवाहर लाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात रविवारी ( दि. ५ जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घूसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. ‘अभाविप’कडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर अभाविपने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.