अभिषेक बच्चनने जवळपास दोन वर्षांनंतर ‘मनमर्जियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं आहे. अभिषेक, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या चित्रपटातील एका दृश्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचं समोर आलं आहे. यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी शीख बांधवांची जाहीर माफी मागितली आहे.

‘या चित्रपटामध्ये तीन व्यक्तींचं आयुष्य रेखाटण्यात आलं आहे. त्यामुळे यात जे दृश्य दाखविण्यात आलं आहे तो चित्रपटाचा एक भाग आहे. यामध्ये शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखाविण्याचा कोणताच हेतू नाही. विशेष म्हणजे हा सीन करताना पगडी उतरविण्याची पद्धतदेखील आम्ही काही शीख बांधवांकडून शिकलो होतो. या भागाचं दृश्य चित्रीत होत असताना सेटवर जवळपास १५० शीख बांधव उपस्थित होते, त्यामुळे तुमच्या भावना दुखाविल्या जातील असं आम्ही केलेलं नाही’,असं म्हणत अनुराग कश्यप यांनी शीख बांधवांची माफी मागितली आहे.

 

पुढे ते असंही म्हणाली, ‘या प्रकरणी मी मनापासून माफी मागत आहे. मात्र या मुद्द्यावरुन कोणतही नवं वादळ निर्माण होऊ नये असं वाटतंय कारण कोणत्याही जाती-धर्मावर टीका करणं किंवा त्यांच्या भावनांना ठेच पोहोचावणं हा या दृश्यामागील हेतू नव्हता’.

दरम्यान, हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेमध्ये झळकले असून अभिषेकने  दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यामुळे सध्या त्याच्या चाहत्यांसाठी खुश असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अभिषेकच्या पदरात आणखी काही चित्रपट पडले असून तो लवकरच पत्नी ऐश्वर्याबरोबर आगामी ‘गुलाबजामुन’ या चित्रपटात झळकणार आहे.