दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या सिनेमांसोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळंही कायम चर्चेत असतो. पण आज मात्र तो नाही तर त्याची मुलगी चर्चेत आहे. तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक खुलासा केला आहे.

अनुरागची मुलगी आलिया कश्यपने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने सांगितलं आहे की तिला कशा पद्धतीने लोकांच्या घाणेरड्या कमेंट्समुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. काही वेळा तर तिला बलात्त्काराच्या धमक्या आल्याचंही तिने सांगितलं आहे. एका नामांकित ब्रँडसाठी लाँजरी शूट केल्यानंतर तिला हा कटु अनुभव आला आहे. तिने सांगितलं की या भीतीपोटी तिला तिचं पेजही डिलीट करावं लागलं होतं. आजपर्यंत तिला एवढी भीती कधीच वाटली नव्हती.

गेल्या काही आठवड्यांपासून आपली मनस्थिती ठीक नसल्याचं तिने सांगितलं. जेव्हापासून आपण तो लाँजरीमधला फोटो पोस्ट केला, तेव्हापासून अतिशय घाण आणि खालच्या पातळीवरच्या कमेंट्स तिच्या फोटोवर येऊ लागल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणाली. “मी बऱ्याचदा ठरवलं की अशा घटनांवर, अशा गोष्टींवर आपण बोलायला हवं. कारण ह्या गोष्टीच भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात रेप कल्चरला कारणीभूत ठरतायत आणि त्याला खतपाणीही घालत आहेत. लोक बलात्कार पीडितेसाठी कँडल मार्च काढतात, पण जीवंत महिलेला मात्र सुरक्षित ठेवू शकत नाहीत”,असंही तिने लिहिलं आहे

काही दिवसांपूर्वी तिने एका व्हिडिओमध्ये तिला कशा प्रकारे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे याबद्दल सांगितलं होतं. मी खूप संवेदनशील आहे. अगदी थोड्या द्वेषपूर्ण गोष्टींचा, कमेंट्सचाही मला लगेच त्रास होत असल्याचंही ती म्हणाली.