अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं साधरण १० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००८ मध्ये अनुष्काचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळेच तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे तिचा पाहिला चित्रपटही डिसेंबरमध्येच प्रदर्शित झाला होता. आता तिचा ‘झिरो’ हा चित्रपटदेखील डिसेंबरमध्येच प्रदर्शित होत आहे, योगायोग म्हणजे यातही तिचा सहकलाकार म्हणून शाहरुखच असणार आहे. १२ डिसेंबरला तिचा ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं अनुष्का रातोरात स्टार झाली. गेल्या दहा वर्षांत अनुष्कानं वीसहून अधिक चित्रपटात काम केलं. त्यातले पाच सुपरहिट ठरलेले चित्रपट आपण पाहणार आहोत.

बँड बाजा बारात
२०१० साली आलेला ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अनुष्काला बॉलिवूडमध्ये येऊन जेमतेम दोन वर्ष झाली होती. तर या चित्रपटातून रणबीर सिंगनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे दोन्ही चेहरे नवे असतानाही दमदार अभिनय आणि कथेच्या जोरावर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

पीके
२०१४ साली आमिर खानसोबत आलेला अनुष्काचा पीकेही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पिक्सी कटमधला अनुष्काचा लूक, पत्रकाराची तिची भूमिका अनेकांना आवडली. विशेष म्हणजे चीनमध्येही अनुष्का- आमिरच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान प्रसिद्धी मिळाली.

NH10
अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला NH10 हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला. अंगावर काटा आणणारी दृश्ये, कहाणी यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटात शेवटपर्यंत लढणारी अनुष्का अनेकांना आवडली. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनुष्काच्या अभिनयाचं कौतुकही खूप झालं.

सुलतान
सुलतान चित्रपटाच्या निमित्तानं अनुष्काला बॉलिवूडमधल्या तिसऱ्या खान सोबत म्हणजेच सलमान सोबत काम करण्याची संधी मिळाली. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सुलताननं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटात अनुष्का कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटासाठी अनुष्कानं खास कुस्तीचं प्रशिक्षणही घेतलं होतं.

सुई धागा
या वर्षांत प्रदर्शित झालेला अनुष्काचा ‘सुईधागा’ही तितकाच हिट ठरला. आतापर्यंत कधीही न साकारलेली भूमिका अनुष्कानं यात साकारली. अनुष्कासोबत वरूणचीही प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं १०० कोटींहून अधिकची कमाई केली.