अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई- धागा’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या निमित्तानं अनुष्का वेगळ्या भूमिकेत दिसली. खरं तर चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अनुष्काच्या भूमिकेकडे पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली. या वर्षांत सोशल मीडियावर सर्वाधिक मीम्सचा विषय ही अनुष्काच होती.

अनुष्कानं नुकतीच एका मुलाखतीत या चित्रपटातील तिच्या ममताच्या भूमिकेविषयी भीती व्यक्त केली. ‘आतापर्यंत मी अशा प्रकारची भूमिका कधीही केली नव्हती. त्यामुळे मला या भूमिकेत लोक स्विकारतील का असा प्रश्न सारखा माझ्या डोक्यात यायचा. मोठ्या धाडसानं मी ही भूमिका निवडली. मला वेगळा प्रयोग करून पाहायचा होता. जर हा चित्रपट अपयशी ठरला असता किंवा लोकांना माझी भूमिकाच आवडली नसती तर मात्र मी खूप दुखावले असते. मी संभ्रमात पडले असते’ असंही ती म्हणाली.

पण सुदैवानं प्रेक्षकांना अनुष्का शर्माची भूमिका खूपच आवडली. अनुष्कानं वेगळी भूमिका साकारली म्हणूनच तिचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुकदेखील केलं. छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा सुई- धागामध्ये पाहायला मिळणार आहे. मौजीच्या हातात शिवणकला आहे मात्र त्या कलेवर घर चालू शकत नाही, यावर ठाम विश्वास असलेल्या मौजीच्या वडिलांनी (रघुवीर यादव) आयुष्यभर सरकारी नोकरी केली. आणि निवृत्तीनंतर मौजीनेही कुठेतरी नोकरी करून घरसंसार चालवावा ही त्यांची अपेक्षा आहे. एका शिलाई मशीनच्या दुकानात काम करणाऱ्या मौजीला मालकांची मर्जी सांभाळण्यासाठी जे खेळ करावे लागतात ते पाहून अपमानित झालेली ममता त्याला स्वत:चा काहीतरी उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करते आणि याच संघर्षावर सुई धागा आधारलेला आहे. या चित्रपटानं‘सुई- धागा’नं एकूण ५५.३५ कोटींची कमाई केली आहे.