अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून येत्या नवीन वर्षात ती बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणातील विविध फोटो ती आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करते. सोशल मीडियावर तिने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. बेबी बंपसोबत अनुष्काने केलेला हा शीर्षासन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरतोय.

भिंतीचा आधार घेऊन अनुष्काने शीर्षासन केलं असून पती विराट कोहलीने तिच्या पायांना आधार दिला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘हा सर्वांत अवघड व्यायामाचा प्रकार आहे. योगसाधना माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं. एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते. शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या खातर माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे.’

विविध योगासनांपैकी शीर्षासन हे अत्यंत महत्त्वाचं आसन आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. या आसनामुळे मेंदूपर्यंत अधिक रक्तपुरवठा होतो. मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं. योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच ते करावं. सुरुवातीला हे आसन भिंतीचा आधार घेऊन केलं जातं.