आपल्या भावना, आपली मतं व्यक्त करण्यासाठी सहज उपलब्ध असणारा पर्याय म्हणजे सोशल मीडिया. मात्र याच सोशल मीडियावर आजकाल आपण कोणत्या गोष्टीमुळे ट्रोल होऊ याचा काही नेम नाही. सेलिब्रिटींच्या बाबतीत हे सहसा घडताना आपण पाहत असतोच. अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नुकतंच असं काहीसं घडलं आहे. आपल्या व्यग्र कामकाजातून वेळ काढून स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेली अनुष्काच सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच अनुष्का पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाशी जोडली गेली. त्याअंतर्गत तिने गुरुवारी वर्सोवा बीचवर स्वच्छतेची मोहीम राबवली. बीचवरचा कचरा उचलतानाचा फोटो अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आणि नेटिझन्सना हेच कारण मिळालं. फक्त प्रसिद्धीसाठी हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, असे कमेंट्स तिच्या फोटोवर येऊ लागले. तर काहींनी साफसफाई करण्याऐवजी फोटोशूट करत बसल्याचा आरोपही तिच्यावर लावला.

वाचा : ‘केबीसी ९’ला मिळाली पहिली कोट्यधीश 

अनुष्काने तिच्या फोटोसोबत एक भली मोठी कॅप्शनसुद्धा दिली होता. स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करणारी ही कॅप्शन होती. मात्र स्वच्छतेपेक्षा तिने लोकांना ज्ञान देण्यातच आपला वेळ घालवला, अशीही कमेंट एका नेटिझननं दिली. आपण राबवलेल्या अभियानानंतर ट्रोल केले जाऊ अशी अपेक्षाही अनुष्काने केली नसेल. आता यावर नेटिझन्सना ती काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल