कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करायची असेल तर वाढदिवसाहून चांगला दिवस तो कोणता? तेव्हा आजच्या दिवशी एक पाऊल पुढे टाकत अनुष्कानं खास मुक्या जीवांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू केलं आहे. आज अनुष्काचा वाढदिवस आहे तेव्हा बॉलिवूडच्या ‘परी’नं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्राण्यांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू केल्याची आनंदवार्ता दिली आहे.
‘मी मुंबईबाहेर प्राण्यांसाठी निवारा बांधत आहे. ज्यांना मालकांनी सोडलं, ज्यांनी या जगात क्रूर अनुभव घेतले अशा जीवांसाठी हे घर असणार आहे. जिथे त्यांची मायेनं काळजी घेतली जाईल. प्राण्यांसाठी त्यांच्या हक्काचं घर असावं हे माझं स्वप्न होतं. आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. यासाठी मला फक्त तुमचे आशीर्वाद आणि मदत हवीय’ अशी पोस्ट तिनं ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केली आहे.
अनुष्का ही प्राणीप्रेमी आहे. तिचं प्राणीप्रेम लपून राहिलं नाही. ‘आपण माणूस आहोत, आपण बोलू शकतो. आपल्याला हक्क आहेत न्यायासाठी आपण लढू शकतो, पण या मुक्या जीवांचं काय? ते आपल्यासारखे हक्कांसाठी लढू शकत नाही. त्यांना आपण योग्य वागणूकही देत नाही. माणूस हा सर्वात बलवान मानला जातो. त्यामुळे या प्राण्यांप्रती आपलं काही कर्तव्य आहे. म्हणून मी दलाई लामा यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन या प्राण्यांसाठी घर बांधत आहे असं लिहीत तिनं आपल्या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे. तिच्या या स्तुत्य उपक्रमाचं तिच्या चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 4:25 pm