एकीकडे करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधल्या कलाकारांनी करोना रूग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावताना दिसून येत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी सुरू केलेल्या करोनाविरोधी मोहिमेला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या दोघांनी अवघ्या २४ तासांमध्ये साडे तीन कोटी रूपये जमा केले आहेत. या दोघांनी एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. करोनाचा हाहाकार पाहून दोघांनी आधी स्वत: 2 कोटींची मदत जाहीर केल्यानंतर आता केट्टो या संस्थेसोबत एक अभियान राबवत आहे. या अभियानाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. यासाठी त्यांनी सुरवातीला ७ कोटींचा निधी जमा कऱण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. त्यानंतर केवळ 24 तासांत 3.6 कोटी रुपयांची मदत लोकांनी केली आहे.

दोघांनी सुरू केलेल्या मोहिमेला लोकांचा प्रतिसाद पाहून दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले. निम्म लक्ष्य पार केलं आहे आणि उर्वरित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूयात, असं विराट कोहलीने या ट्विटमध्ये लिहिलंय.

तसंच त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बोलताना सेलिब्रिटींच्या निष्क्रीयतेवर भाष्य करत टिका केली. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतो आहे. देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे, तिच्यासमोर काही आव्हानं आहेत. ज्या परिस्थितीतून लोक जात आहे ते पाहून वाईट वाटतंय, आपल्या मदतीची लोकांना गरज आहे, असं म्हणत विराट-अनुष्काने लोकांना मदतीचं आवाहन केल होतं.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली मुंबईत परतल्यानंतर करोना काळात लोकांच्या मदतीसाठी काम करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. यासंदर्भात युवा सेनेचा कोर कमिटी सदस्य राहूल एन कनाल यांच्यासोबत त्याने भेट देखील घेतली होती. या भेटीचा एक फोटो देखील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता.