बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी अनेकांच्या मदतीला धावून आले आहेत. गरजूंना मदत करण्यासाठी ते निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएल २०२१ला करोना व्हायरसमुळे स्थगित केल्यानंतर आता विराट गरजूंना मदत करण्यासाठी सरसावला आहे. अनुष्का आणि विराटने याबाबत सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

अनुष्काने ट्वीटर अकाऊंटवर पती विराट कोहलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपला देश लढा देत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या लोकांच्या समस्या पाहून मला दु:ख झाले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether ही मोहिम सुरु केली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा: ‘अब तो आदत सी हो गयी है ऐसे जीने की’, आयपीएल स्थगित केल्याने मीम्सचा पाऊस

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच देशाला विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या तडाख्यात सापडत असून, अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. भयावह गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला असून, फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकांच्या मदतीला धावून आले आहेत.