विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आता लवकरच इतरांना स्वच्छतेचे धडे देताना दिसणार आहे. कोणा एका चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का एका शिक्षिकेच्या वगैरे भूमिकेत दिसणार आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. बी टाऊनची ही बबली गर्ल आता लवकरच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तिचे योगदान देताना दिसणार आहे.

शहर विकास मंत्रालयाद्वारे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या नावाला प्राधान्य देण्यात आले आहे. महिला आणि ग्रामीण भागांमध्ये स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व आणि त्याविषयीची जनजागृती करण्यासाठी अनुष्काची निवड करण्यात आली आहे.

मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अनुष्काची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. जेणेकरुन अनुष्का स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुख्य मुद्द्यांवर भाष्य करु शकेल आणि आरोग्यविषयक माहितीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत योगदान देण्यासाठी अनुष्काने दोन व्हिडिओंचे चित्रिकरणही पूर्ण केले आहे. या व्हिडिओंमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शौचालयाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पिंकव्हिला या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अनुष्काने या अभियानामध्ये सकारात्मक सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील गुडगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमासाठीही अनुष्काने हजेरी लावली होती.

अनुष्काच्या आगामी चित्रपटांबद्दल म्हणायचे झाले तर येत्या काळात ती ‘फिल्लौरी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये पंजाबी अभिनेता दिलजित दोसांजही झळकणार आहे. यासोबतच अनुष्का इम्तियाज अलीच्या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये ती शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. पण, त्या चित्रपटाचे नाव मात्र अद्यापही सांगण्यात आलेले नाही.