आप्पा आणि बाप्पा

देव ही संकल्पना मानायची ठरवली की श्रद्धा-अंधश्रद्धा, विश्वास-अविश्वास, तार्किक-अतार्किकतेचा एकच खेळ सुरू होतो. देव आहे की नाही आणि असलाच तर त्याचे स्वरूप काय याचे कोडे आपापल्या परीने उलगडण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत अनेकदा हिंदी-मराठी चित्रपटांतून करण्यात आला आहे. ‘ओह माय गॉड’ आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ ही त्याची दोन ठसठशीत उदाहरणे म्हणता येतील. अश्वनी धीर दिग्दर्शित ‘आप्पा आणि बाप्पा’ हा या दोन चित्रपटांच्या तोडीचा मुळीच नसला तरी याच मालिकेतील एक प्रयत्न आहे, असे म्हणता येईल.

साध्या मिठाईच्या दुकानात काम करणारा आप्पा (भरत जाधव) अगदीच सर्वसामान्य आहे. त्याचा सर्वसामान्यपणा त्याच्या भल्यामोठय़ा वाडेवजा घराक डे पाहून पटत नसला तरी तो सर्वसामान्य आहे. मुलीच्या मागण्या, घरच्या जबाबदाऱ्या, मुलाचे हट्ट याने तो त्रासलेला आहे. बाहेर सगळे त्याची हेटाळणी करतात, त्याचा अपमान करतात. हा सगळा राग एका टेकडीवर जाऊन मोठमोठय़ाने पुणेकरांच्या नावाने आरडाओरडा करत तो मोकळा करतो. तर अशा रंजल्यागांजल्या आप्पाचे कंबरडे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अधिकच मोडते. यावेळी गणेशोत्सवात सगळ्या नातेवाईकांना बोलवून जेवू घालायची इच्छा आप्पाचे वडील नाना (दिलीप प्रभावळकर) व्यक्त करतात. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीत भव्य सजावट वगैरे केली जाते, जेवणावळी घातल्या जातात. अर्थात, हा सगळा खर्च आप्पाला करावा लागणार नाही, तर आपले ठेवीचे पैसे बँकेत आहेत ते काढून आण आणि त्यातून हा खर्च भागव, असे नाना सांगतात खरे.. मात्र नानांचे पैसे ज्या बँकेत आहेत ती बँक काही आप्पाला दाद लागू देत नाही. अखेर वैतागलेला आप्पा जोवर बँकेचे पैसे मिळणार नाहीत तोवर गणपतीचे विसर्जन करणार नाही, अशी जाहीर घोषणा करतो. इथूनच बाप्पाच्या आणि पर्यायाने आप्पाच्याही संघर्षांची सुरुवात होते.

या चित्रपटाची कथाकल्पना फार वेगळी नाही, मात्र त्याला सध्या जे बँकोंचे आर्थिक घोटाळे सुरू आहेत आणि त्यांना टाळे लागते आहे, याचा ताजा संदर्भ जोडला गेला आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या पैशावर या बँकांचे आर्थिक व्यवहार चालतात त्याच बँका मोठमोठय़ा लोकांना कुठल्याही हमीपत्राशिवाय मोठी कर्जे मंजूर करतात, मात्र शेतक ऱ्याने घेतलेले कर्ज मिटले असले तरी त्याच्यावर हप्त्यांच्या मारा सुरूच राहतो. त्याच्याकडून बळजबरीने ते वसूल करण्याचे प्रयत्न केले जातात. या विरोधाभासावर लेखक-दिग्दर्शकाने बोट ठेवले आहे. या चित्रपटाचे लेखन अश्वनी धीर आणि अरविंद जगताप या दोघांनी केले आहे. त्यामुळे हा विषय चित्रपटातून मांडला गेला आहे.

अश्वनी धीर यांनी याआधी ‘सन ऑफ सरदार’, ‘अतिथी तुम कब जाओगे’सारख्या चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. मुळातच त्यांची दिग्दर्शन शैलीही भडक आणि रंजकपणाक डे जास्त झुकलेली आहे. त्यामुळे त्याच शैलीचा परिणाम ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटावर झाला आहे. एखाद्या मालिकेच्या सेटवर घडावा अशा पद्धतीचे भडक चित्रीकरण कथेला मारक ठरले आहे. कथेची मांडणी करतानाही हिंदीत वापरून गुळगुळीत झालेले तेच विनोदाचे ठोकताळे यातही जागोजागी पेरण्यात आले असल्याने विषय चांगला असूनही प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात चित्रपट वेगाने पुढे सरकतो. त्यातही आप्पा आणि बाप्पामधले काही संवाद, आप्पात होणारा बदल या सगळ्या गोष्टी थोडय़ाफार प्रमाणात दिग्दर्शकाने योग्य पद्धतीने रंगवल्या आहेत. मात्र नको त्या व्यक्तिरेखांचा भरणा, अनेक कलाकारांची नाटकी संवादशैली या सगळ्याचा फटका चित्रपटाला बसला आहे. खरे तर भरत जाधव खूप काळानंतर चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र सुरुवातीच्या प्रसंगात त्याच त्याच नाटकातील पद्धतीप्रमाणे त्याचे हावभाव पाहणाऱ्याला अस्वस्थ करतात. मात्र सुबोध भावे आणि भरत जाधव यांच्यातील काही प्रसंग, त्यांच्यातील तू तू मी मी काही प्रसंगात चांगले रंगले आहे. सुबोध भावेंचा बाप्पा अर्थातच प्रेक्षकांना सुखावणारा आहे. दिलीप प्रभावळकरही त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. हा बाप्पा गणेशोत्सवातच प्रेक्षकांच्या भेटीला येता तर काही अधिक संदर्भ जोडता आला असता. पण दिवाळीच्या का आधी होईना आप्पाचा बाप्पा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला हेही नसे थोडके!

आप्पा आणि बाप्पा

दिग्दर्शक – अश्वनी धीर

कलाकार – भरत जाधव, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे, उमेश जगताप.