“रणबीर व आलियापेक्षा चांगले कालाकर शोधून दाखवा, म आपण बोलू” असे वक्तव्य चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांनी घराणेशाही या वादावरुन केले होते. आता चित्रपट एडिटर आणि लेखक अपूर्व असरानी यांनी आर बाल्की यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

अपूर्व यांनी ट्विट करत आर बाल्की यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ‘मनोज वाजपेयी, राजकुमार राव, विक्की कौशल, आयुषमान खुराना, कंगना रणौत, प्रिंयका चोपड़ा, तापसी पन्नू, विद्या बालन, रिचा चड्ढा असे अनेक कलाकार आहेत. मला रणबीर आणि आलिया आवडतात. पण केवळ तेच चांगले कलाकार नाहीत’ असे अपूर्व यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. सुशांतच्या चाहत्यांनी स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. एका मुलाखतीमध्ये बाल्की यांना घराणेशाही या वादावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी काही कलाकारांच्या बाबतीत घराणेशाही हा शब्द वापरणे चुकीचे आहे असे म्हटले होते.

‘स्टार किड्सला खरच मोठा फायदा असतो का? असा प्रश्न आहे. तर मी सांगेन हो. जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत. मला तुम्हा सर्वांना एक साधा सरळ प्रश्न विचारायचा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या पेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवला आणि मग आपण यावर बोलू. असे बोलून आपण त्यांच्यासारख्या अतिशय चांगल्या कलाकारांवर अन्याय करत आहेत’ असे त्यांनी पुढे म्हटले होते.

आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक करण्याऐवजी लोकं तिला एका चित्रपट निर्मात्यांची मुलगी आहे म्हणून ट्रोल करत आहेत असेही त्यांनी म्हटले होते.