19 February 2019

News Flash

‘या’ निर्मात्याने पहिल्यांदाच शेअर केला प्रियकरासोबतचा फोटो

दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी बाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर सर्वच स्तरातून याचं स्वागत करण्यात आलं. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींकडूनही या निर्णयाचं स्वागत झालं. न्यायलयाने दिलेल्या या निर्णयामुळे या समुदायातील व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या निर्णयानंतर पहिल्यांदाच एका चित्रपट निर्मात्याने त्याच्या प्रियकराबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी बाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर देशभरामध्ये एकच जल्लोषाचे वातावरण पसरलं होतं. न्यायालयाच्या निर्णयानंतर चित्रपटनिर्माता अपूर्व असरानीने प्रियकराबरोबरचा फोटो शेअर करत त्याच्या ११ वर्षांच्या नातेसंबंधांना सर्वासमक्ष मान्य केलं आहे. त्यामुळे सध्या समाजासमोर उघडउघड आपलं नात मान्य करणारा अपूर्व हा पहिला व्यक्ती ठरला आहे.


‘अपूर्वने शेअर केलेला हा फोटो पॅरिसमधील एफिल टॉवरजवळील असून या फोटोमध्ये त्याच्याबरोबर त्याचा प्रियकर दिसून येत आहे. गेल्या ११ वर्षापासून आम्ही दोघं एकमेकांची साथ देत आहोत. अनेकवेळा कायद्याचा धाक दाखवून आमची आडवणूक करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या प्रेमाने आम्हाला कधीच वेगळं होऊ दिलं नाही. मात्र आम्हाला आमचं नातं कधीच जगजाहीर करता आलं नाही. न्यायलयाने दिलेल्या निर्णयामुळे आता आम्हाला आमचं नातं लपवावं लागणार नाही’, असं कॅप्शन अपूर्वने या फोटोला दिलं आहे.

अपूर्वच्या प्रियकराचं नाव सिद्धांत पिल्लई असं असून हे दोघंही मुंबईस्थित असल्याचं सांगण्यात येतं. अपूर्व बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता असून त्याने ‘अलीगढ’,’ शाहिद’ या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे त्याचा ‘अलीगढ’ हा चित्रपटही एका समलैंगिक प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित असल्याचं पाहायला मिळतं.

First Published on September 11, 2018 1:45 pm

Web Title: apurva asrani shares photo with his homosexual partner