अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील शेवटचा भाग ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भारतात माव्‍‌र्हल सुपरहिरोपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. या वर्गाला खूश करण्यासाठी आता या चित्रपटात खास गाणंही असणार आहे. हे गाणं ए. आर. रेहमान संगीतबद्ध करणार आहे. फक्त भारतीय चाहत्यांसाठी हे गाणं असून ते तीन भारतीय भाषांत प्रदर्शित होणार आहे.

ए.आर. रेहमान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार आहेत. मार्व्हल स्टुडिओनं भारतीय चाहत्यांसाठी खास गाणं तयार करण्याबद्दल रेहमान यांच्याकडे विचारणा केली होती. रेहमान यांनी होकार दिला असून हिंदी, तामिळ तेलगु या भाषांमध्ये हे गाणं प्रदर्शित होणार आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी १ एप्रिलला रेहमानचं खास गाणं प्रदर्शित होणार आहे.

भारतात माव्‍‌र्हल सुपरहिरोपटांचा मोठा चाहता वर्ग आहे. या वर्गाला खूश करण्यासाठी चित्रपटातील कलाकार भारतात येणार आहेत. भारतात केल्या जाणाऱ्या या जाहिरातीची सुरुवात दिग्दर्शक अँथोनी रुसो व जो रुसो मुंबईतून करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ या चित्रपटाला भारतातील इतर शहरांच्या तुलनेने मुंबईकरांनी भरभरून दाद दिली होती. एकटय़ा मुंबईतच या चित्रपटाने ७० कोटी रुपयांची कमाई केली. या पार्श्वभूमिवर विचार करता मुंबई ही सुपरहिरोंसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणूनच माव्‍‌र्हल स्टुडिओने मुंबईतूनच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’च्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक रुसो बंधूंबरोबरच आयर्नमॅन ही व्यक्तिरेखा साकारणारा सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियरही मुंबईकरांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे.