बुरखा घालणे हा माझ्या मुलीचा स्वतंत्र निर्णय आहे. तिने हा निर्णय घेण्यापूर्वी आम्हा कुणालाही विचारले नव्हते. पुरुष बुरखा घालत नाहीत, पण संधी मिळाली असती तर मीसुद्धा बुरखा घातला असता, अशा शब्दांत ऑस्कर विजेते संगीतकार व गायक ए. आर. रहमान यांनी मुलीच्या बुरखा प्रकरणावर उत्तर दिलं. रहमान यांची मुलगी खतिजा हिचा बुरखा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्विट करत लिहिलं होतं की, ‘खतिजाला बुरख्यात पाहिल्यावर माझा जीव घुसमटतो.’ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही ए. आर. रहमान यांच्यावर टीका केली होती.

या संपूर्ण वादावर रहमान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला वाटतं धार्मिक गोष्टीपेक्षा ही एक मानसिक गोष्ट आहे. मला संधी मिळाली असती तर मीसुद्धा नक्कीच बुरखा घातला असता. कुठल्याही दुकानात जाऊन मी अगदी मजेत शॉपिंग करू शकलो असतो. कदाचित बुरखा घालण्यात तिला तिचं स्वातंत्र्य जाणवत असावं. मोलकरीणीची आई किंवा तिच्या कुटुंबीयांचं निधन झालं तर ती त्यांच्या अंत्यविधीलाही जाते. हा तिच्या स्वभावाचा साधेपणा आहे आणि सामाजिक जीवनातील तिचा हा साधेपणा पाहून मीसुद्धा आश्चर्यचकीत होतो.”

तस्लीमा नसरीन यांना खतिजाने दिलं होतं सडेतोड उत्तर 

खतिजाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित तस्लीमा यांना बुरखा प्रकरणावर सडेतोड उत्तर दिलं होतं. देशात इतकं काही घडतंय आणि लोकांना फक्त या गोष्टीची काळजी आहे की एका महिलेला कोणता पोशाख परिधान करायचा आहे? जेव्हा जेव्हा हे प्रकरण समोर येतं तेव्हा तेव्हा मला खूप काही बोलायची इच्छा होते. आयुष्यात मी जे निर्णय घेतले आहेत त्यांचा मला अभिमान आहे आणि त्यात मी खूप खूश आहे. प्रिय तस्लीमा नसरीन, माझ्या बुरख्यामुळे तुमचा जीव घुसमटतोय, याची मला कीव येते. कृपया तुम्ही जरा बाहेर पडून मोकळी हवा खा. कारण मला यात घुसमटल्यासारखं अजिबात वाटत नाही. खरा स्त्रीवाद काय असतो याबाबत तुम्ही जरा गुगलवर सर्च करा. कारण दुसऱ्या महिलेचा अपमान करणं आणि त्यांच्या वडिलांना वादात अडकवणं हा स्त्रीवाद नसतो.