‘स्लमडॉग मिलेनिअर’ या गाजलेल्या चित्रपटानंतर जगप्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमान डिस्नेच्या ‘मिलियन डॉलर आर्म’ या हॉलिवूडपटाला पाश्र्वसंगीत दिले आहे. या चित्रपटासाठी नव्याने संगीत रचना करताना त्यांच्या स्वत:च्या काही खास जुन्या रचनांचा वापरही या चित्रपटात केला आहे.
 डिस्नेचा ‘मिलियन डॉलर आर्म’ हा चित्रपट बेसबॉल या खेळाभोवती गुंफण्यात आला असून चित्रपटाची कथा अमेरिके तून भारत आणि त्यानंतर भारतीय खेळाडूंची बेसबॉलसाठीची अमेरिकावारी, त्यांना मिळणारे प्रशिक्षण, इतर खेळाडूंकडून मिळणारी वागणूक, हार-जीत अशा विविध अंगाने गुंफण्यात आली आहे. याआधी डॅनियल बोएल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या हॉलिवूडपटाच्या संगीतासाठी रहमान यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आता नव्या चित्रपटासाठी रेहमान यांची संगीतरचना कशी असेल, याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही उत्सूकता आहे. या चित्रपटाच्या संगीताचे काम आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असल्याचे रेहमान यांनी ‘ट्विटर’वर नमूद केले आहे.
‘मिलियन डॉलर आर्म’ या चित्रपटाच्या म्युझिक अल्बममध्ये इगी अ‍ॅझेलिया ही ऑस्ट्रेलियन रॅप गायिका, केंड्रीक लमार या अमेरिकन हिप हॉप गायकाबरोबर सुखविंदर सिंग, राघव माथुर यांची गाणी असल्याचे रेहमान यांनी म्हटले आहे. याशिवाय, आपल्या नव्वदच्या संगीतरचनांमधील एका तामिळ गाण्याचा समावेशही या अल्बममध्ये केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून ते गाणे चित्रा आणि उन्नीकृष्णन यांनी गायले आहे. ‘मिलियन डॉलर आर्म’ या चित्रपटात ‘लाईफ ऑफ पाय’चा नायक सूरज शर्मा आणि ‘स्लमडॉग मिलेनिअर’मधील मधुर मित्तल यांच्यासह हॉलिवूड अभिनेता जॉन हॅम यांच्या मुख्य भूमिका असून ९ मे रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे.