मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहरमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून होणाऱ्या ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित करत त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. जया बच्चन यांनी यावर आक्षेप घेत “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण सोशल मीडियावर काहींनी त्यांना ट्रोल केले. एका यूजरने तर जया बच्चन यांची नात आराध्यावर निशाणा साधत ट्विट केले. ते ट्विटपाहून अभिनेत्रीने ट्रोलरला सुनावले आहे.

एका यूजरने जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने ‘प्रत्येकाची वेळ येते. काळजी करु नका आराध्या बच्चन लवकरच मोठी होणार आहे’ असे म्हटले आहे.

त्यावर अभिनेत्री काम्या पंजाबीने त्या ट्रोलरला उत्तर देत सुनावले आहे. ‘तू आजारी आहेस वाटतं. ट्रोल करणारे सगळेच थोडे आजारी असतात. तुमची कोणी बाजू घेऊन बोलले तर ती व्यक्ती चांगली. खरे सांगयचे झाले तर एखाद्याच्या मुलाला कोणत्याही गोष्टीमध्ये खेचण्यापूर्वी विचार का करत नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात या गोष्टींचा सामना केला आहे. मला आणि माझ्या मुलीला ट्रोल करणं तुमच्या सारख्या लोकांसाठी ट्रेंडच झाला होता’ या आशयाचे ट्विट काम्याने केले आहे.