आरती अंकलीकर-टिकेकर यांची भावना

रागसंगीत सादर करण्यासाठी पूर्वी कलाकाराकडे तीन तासांचा कालावधी असे. त्यामुळे त्या वेळच्या मैफलींमध्ये गायनातून श्रोत्यांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. आता मैफलींसाठी उपलब्ध असलेला वेळ कमी झाला. कमी झालेला वेळ हे सर्जनशीलतेपुढील प्रमुख आव्हान असून भविष्यात ख्याल प्रकारातील गायन टिकवणे ही कलाकार आणि रसिक श्रोत्यांची जबाबदारी असेल, असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवानिमित्त आयोजित ‘अंतरंग’ उपक्रमात मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आरती अंकलीकर-टिकेकर आणि महेश काळे यांच्याशी संवाद साधला. या कलाकारांनी आजच्या काळातील ‘सर्जनशीलतेची आव्हाने’ या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यापूर्वी ‘षड्ज’ या उपक्रमांतर्गत रजत कपूर दिग्दर्शित ‘तराना’ आणि पी. के. सहा दिग्दर्शित ‘सारंगी – द लॉस्ट कॉर्ड’ हे लघुपट दाखविण्यात आले.

आरती अंकलीकर-टिकेकर म्हणाल्या, महोत्सव कोणता, श्रोते किती, भोवताल कसा यापेक्षा कलाकाराचा स्वत:शी असलेला संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे. रागसंगीत गाणाऱ्यांनी उपशास्त्रीय प्रकार गाऊ नयेत असे आमचे गुरू सांगत, कारण प्रत्येक प्रकाराचा भाव वेगळा तसेच आवाजही वेगळा आहे. प्रत्येक प्रकाराला आपल्या सीमा आहेत, त्या कलाकारांनी ओलांडू नयेत. पूर्वीच्या काळी कलाकार, गायक, वादक यांना राजाश्रय असे. चरितार्थाची चिंता न करता त्यांनी केवळ कला जोपासावी आणि ती पुढे न्यावी हा या राजाश्रयाचा उद्देश होता. आता दिवस बदलले असले, तरी आजही मोठे उद्योजक आहेत. रागसंगीतातील गायकांना त्यांनी उचित साह्य़ करावे आणि कलेची सेवा करू द्यावी.

महेश काळे म्हणाले, पं. जितेंद्र अभिषेकी बुवांकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेतल्यामुळे पेशकश नव्हे तर रियाज महत्त्वाचा असतो हे मी शिकलो. त्यामुळेच आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये मी टिकून राहू शकलो. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेल्यानंतर प्रत्येक सत्रामध्ये एक या प्रमाणे मी पाश्चात्त्य संगीत प्रकारांचे धडे गिरवले. तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीताएवढा आवाका इतर कोणत्याच संगीताचा नसल्याचे लक्षात आले. संगीत नाटकामध्ये गायल्याने शास्त्रीय संगीताचा दर्जा कमी होत नाही. प्रत्येकाने आपल्या आवडीचे संगीत प्रकार ओळखून त्याच्याशी प्रामाणिक राहिल्यास शास्त्रीय संगीतावर आपला चरितार्थ चालवणे अवघड नाही.