बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता अरबाज खान सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या तो श्रीलंकेला गेला असून तेथील काही फोटो तो इन्स्टाग्राम या सोशल साइटवर शेअर करत आहे. हे फोटो पाहता अरबाज जणू एखाद्या राजाप्रमाणेच बीचवर आनंद लुटताना दिसतोय. अरबाज रुपेरी पडद्यावर शेवटचा ‘फ्रिकी अली’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसला होता. त्यानंतर तो आता लवकरच बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिच्यासह ‘तेरा इंतजार’ चित्रपटात झळकणार आहे.

श्रीलंकेला गेलेल्या सलमानच्या या मोठ्या भावाने गुरुवारी मगरीच्या तोडांत पाय टाकलेला फोटो शेअर केला. पण, ही काही खरीखुरी मगर नव्हती. जर ती खरी मगर असती तर अरबाजसोबत काय झाले असते याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी. गेल्या काही दिवसांपासून अरबाज बराच चर्चेत आला आहे. अरबाज आणि मलायकाने जवळपास लग्नाच्या पंधरा वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अरबाज खान ‘दबंग ३’च्या स्क्रिप्टवरही काम करत असल्याचे म्हटले जातेय. ‘दबंग’ सिरीजचा तिसरा भाग असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर चित्रपटाचे चित्रीकरण मार्चमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच, आता अरबाजला चित्रपट निवडण्यात सलमान त्याची मदत करत असल्याचे कळतेय. आपल्या भावाची बॉलीवूडमधील कारकिर्द सावरण्यासाठी सलमानने पुढाकार घेतला आहे.