अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक व अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप याने फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांवर बरेच आरोप केले होते. त्याने सलमानच्या ‘बिईंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहारासाठी होतो, असा आरोप अभिनवने केला होता. या सर्व आरोपांवर अरबाज खानने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि चित्रपट असोसिएशनकडेही याबाबत तक्रार केली आहे. आम्ही या पद्धतीने उत्तर देऊ. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने या वादात उडी घेण्यात आम्हाला रस नाही. या आरोपांना योग्य उत्तर देण्यासाठी जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही करत आहोत.”

काय होते अभिनव कश्यपचे आरोप?

“गुंडगिरीमुळे सलमानवर अनेक गुन्हेगारी खटले सुरु होते. परिणामी सलमानची प्रतिमा मलिन झाली होती. या प्रतिमेतून सलमानला बाहेर काढण्यासाठी वडील सलिम खान यांनी ‘बिईंग ह्युमन’ या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली. आज ही संस्था ५०० रुपयांची जीन्स ५००० रुपयांना विकते. तसंच या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्याने लिहिली आहे. अभिनवची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.