सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या अरिजित सिंग या गायकाने गेल्या आठवडय़ात सलमान खानची जाहीर माफी मागून एकच खळबळ उडवून दिली आहे. ‘सुलतान’ या चित्रपटात सलमानसाठी आपण गायलेले गाणे चित्रपटातही वापरण्यात यावे, अशी विनंती अरिजितने केली आहे. अरिजितने ती पोस्ट नंतर काढून टाकली असली तरी यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अरिजितकडून अनवधानाने सलमानची हेटाळणी झाली होती. या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतर अरिजितने सोहळ्याचे सूत्रसंचालन करत असलेल्या सलमान-रितेश जोडीला ‘तुम्ही तर झोपवलंत..’ असं बोलून त्यांची हेटाळणी केली होती. त्यानंतर अरिजितने कित्येकदा या प्रकरणी सलमानची माफी मागण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्याच्याकडून दाद मिळाली नसल्याची तक्रार अरिजितने आपल्या पोस्टमध्ये के ली होती. मुळात, अरिजितला जाहीरपणे सलमानची माफी मागण्याची गरज का निर्माण झाली?, हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे.
सलमानबरोबर घडलेल्या या प्रसंगानंतर अरिजितच्या आवाजातील एकही गाणे सलमानने आपल्या चित्रपटात वापरू दिले नाही. ‘किक’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या दोन्ही चित्रपटांसाठी अरिजितने गाणी गायली होती. मात्र ती चित्रपटात वापरण्यात आली नाहीत. आताही त्याने ‘सुलतान’साठी गाणे गायले असून ते सलमानवर चित्रितही करण्यात आले आहे. मात्र सलमानचा अजूनही आपल्यावरचा राग गेलेला नाही म्हणून निदान हे गाणे तरी काढून टाकू नये. तुझ्यावर चित्रित झालेले एक तरी गाणे माझ्या संग्रही असू दे, अशी विनंती अरिजितने सलमानला केली आहे.
सलमान खानने अशी कोणतीही ढवळाढवळ केली नसल्याचे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. ‘सुलतान’मध्ये अरिजितने गायलेल्या गाण्यावरच सलमानने चित्रीकरण केले आहे आणि ते गाणे वापरावे की नाही हा निर्णय पूर्णत: निर्माता आदित्य चोप्रा आणि संगीतकार विशाल-शेखर यांचा असल्याने सलमानचा प्रश्न येतोच कुठे?, असा उलट प्रश्न करण्यात आला आहे. मात्र सलमानने अरिजितला भेटण्यासाठी नकार दिला हे खरे असल्याचे त्याचा निकटवर्ती निखिल द्विवेदी याने स्पष्ट केले आहे. मुळात सलमान खान इतका मोठा कलाकार असून त्याने अरिजितसारख्या तुलनेने अगदी नवख्या असलेल्या गायकाबद्दल मनात राग धरावा हे त्याच्या चाहत्यांसाठीही बुचकळ्यात टाकणारे ठरले आहे.
मात्र अरिजितने तरी सलमानची माफी का मागावी?, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे. इंडस्ट्रीत तर सलमानविरुद्ध अशी जाहीर पोस्ट करणाऱ्या अरिजितलाच टीकेचे धनी करण्यात आले आहे. अरिजितने प्रसिद्धीसाठी असा फंडा वापरला आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणाचा जो सोक्षमोक्ष लागायचा असेल तो लागो मात्र या वादामुळे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या तथाकथित खिलाडूवृत्तीचा बुरखा फाडला गेला आहे हेही निश्चित.