बॉलिवूड गायक अरिजीत सिंहच्या आईचे करोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना कोलकत्ता इथल्या AMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अरिजीतच्या आईने २० मे रोजी अखेरचा श्वास घेतला.

अरिजीत सिंहच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती ‘दिल बेचारा’ आणि ‘पाताललोक’ फेम बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने दिली होती. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ‘अरिजीत सिंहच्या आईला A निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. त्या AMRI रुग्णालयात दाखल आहेत’ असे तिने ट्वीटमध्ये म्हटले होते. त्यानंतर चित्रपट निर्माते श्रीजित मुखर्जी यांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे मदत करण्याची विनंती केली होती.

अरिजीत सिंहने २००५मध्ये करिअरला सुरुवात केली होती. त्याने सिंगिग रिअॅलीटी शो ‘फेम गुरुकुल’मध्ये सहभाग घेतला होता. पण या कार्यक्रमामुळे त्याला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. त्याला ‘आशिकी २’ चित्रपटांमधील गाण्याने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर अरिजीतने अनेक हिट गाणी गायिली. ‘कबीरा’, ‘सुनो ना संगमरमर’, ‘मस्त मगन’, ‘हमदर्द’ ही त्याची काही हिट गाणी. अरिजीतने बंगाली चित्रपटांमधील देखील काही गाणी गायिली आहेत.