18 October 2018

News Flash

चाहत्याने अर्जुन कपूरवर केला हल्ला; हाताला दुखापत

अर्जुनला रुग्णालयात नेऊन त्याची चाचणी करण्यात आली

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर सध्या उत्तराखंड येथील पिथौरागढ येथे ‘संदीप और पिंकी फरार’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रीकरण सुरू असताना कमल कुमार नावाची व्यक्ती सेटवर आली होती. यावेळी कमल कुमार मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन अर्जुनची भेट घेतली. त्याने अर्जुनला हात मिळवण्याची विनंती केली. यावेळी अर्जुनने हात पुढे केला असता त्याने अर्जुनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

कमल एक ड्रायव्हर असून अर्जुनवर हल्ला केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, पोलिसांनी त्याच्यावर मद्यप्राशन करुन गाडी चालवण्याचा गुन्हाही दाखल केला आहे. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे.

पिथौरागढ पोलीस ठाण्याचे प्रभारी ध्यान सिंह यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, कमल त्याची गाडी घेऊन आला होता. त्याने अर्जुनला हात मिळवताना अचानक त्याच्यावर हल्ला केला. या झटापटीत अर्जुनचा हात दुखावला गेला. यानंतर अर्जुनला रुग्णालयात नेऊन त्याची चाचणी करण्यात आली. पण त्याच्या हाताला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

‘संदीप और पिंकी फरार’ या सिनेमात अर्जुन कपूरसोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण ३ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते.

First Published on December 7, 2017 5:58 pm

Web Title: arjun kapoor assault sandeep aur pinky faraar parineeti chopra