आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अर्जुन कपूर. नुकताच अर्जुन कपूरचा ‘पानिपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. मात्र चित्रपटातील अर्जुनची सदाशिवराव भाऊंची भूमिका चाहत्यांच्या पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळते आहे. आता अर्जुन अभिनयासोबतच व्यवसाय करणार आहे. त्याने घरगुती खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापन केली आहे.

या कंपनीचे नाव ‘फूडक्लाउड’ असे असून ही एक स्टार्ट-अप कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशातील चार हजाराहून अधिक गृहिणींना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. या उद्योगाच्या माध्यमातून गृहिणींना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी अर्जुन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो आहे. ही कंपनी सुग्रास स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींचा मागोवा घेणार आहे. त्यानंतर त्यांना व्यावसायिक म्हणून समोर येण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे. या घोषणेनंतर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरातील चार हजारहून अधिक महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे. या महिलांनी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी छोटे उद्योग सुरुही केले आहेत.

‘मला असे वाटते की हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी व्यासपीठ एक भरभक्कम सामाजिक हेतू साध्य करू शकेल आणि गृहिणींना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी किंवा त्यांच्या एकूण कुटुंब उत्पन्नात भर घालण्यासाठी कामी येईल. माझ्या दृष्टीने स्वाभिमान आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने ही मोठी झेप ठरेल आजवर मला मिळालेल्या प्रतिसादाने मी आनंदी आहे आणि माझी टीम अजूनही विविध शहरामधील सर्वोत्तम सुगरण गृहिणींचा शोध घेऊनत्यांना या व्यासपीठावर आणत असल्याचं अर्जुनने म्हटलं आहे.

घरातील गृहिणी रुचकर पदार्थ बनवत असतात. घरी तयार करण्यात आलेल्या पदार्थांची चवच न्यारी असते. असेच पदार्थ आता अर्जुन कपूरच्या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचणार आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरानंतर कंपनीने आता सहा नव्या शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे.