अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’चा पोस्टर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या पोस्टरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याने हा वाद निर्माण झाला होता. ही चूक सुधारत आता चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अर्जुन आणि परिणीतीने सोशल मीडियावर हा नवीन पोस्टर प्रदर्शित केला असून यामध्ये भारताचा पूर्ण नकाशा दिसत आहे. मात्र चुकीचा नकाशा का दाखवला यावर अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतंच स्पष्टीकरण दिलेलं नाही.

‘नमस्ते इंग्लंड’च्या जुन्या पोस्टरमध्ये उजव्या बाजूला असलेल्या भारताच्या नकाशावरील जम्मू- काश्मीर राज्यातील अक्साई चीन हा भागच दाखवला गेला नव्हता. देशाचा नकाशा चुकीचा दाखवल्याप्रकरणी या चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर अडचणींचा नक्कीच सामना करावा लागला असता. कारण भारताचा चुकीचा नकाशा दाखवणं हे कायद्यानुसार राष्ट्रीय नकाशा धोरणाचं उल्लंघन मानलं जातं. मात्र वेळीच ही चूक सुधारत त्यांनी जुना पोस्टर सोशल मीडिया आणि इतर सर्व ठिकाणांहून काढून टाकला असून भारताचा पूर्ण नकाशा असलेला नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे.

https://www.instagram.com/p/BmfZWtxgiq9/

वाचा : रणवीर- दीपिकाच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई 

जुन्या पोस्टरवरील नकाशात अक्साई चीन हा भाग दाखवण्यात आला नव्हता. जम्मू- काश्मीरमधील अक्साई चीन या भागावरून भारत आणि चीनदरम्यान वाद सुरू आहेत. या सीमा वादावर भारत- चीन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरीही यावर कोणताही तोडगा अजूनपर्यंत निघालेला नाही.