अभिनेता अर्जुन कपूर सध्या आगामी चित्रपटांमध्ये बराच व्यग्र असून येतं वर्षं त्याच्या करिअरमधलं सर्वात महत्वाचं वर्षं ठरू शकतं. ‘मुबारका’ या चित्रपटातून झळकल्यानंतर आता अर्जुन ‘नमस्ते इंग्लंड’ या प्रोजेक्ट्वर लक्ष केंद्रित करत आहे. त्यासोबतच पानिपतच्या युद्धावर आधारित चित्रपटावरही त्याची नजर आहे. आशुतोष गोवारिकांच्या आगामी ‘पानिपत- द ग्रेट बिट्रेयल’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून त्यासाठी विशेष मेहनतसुद्धा घेत आहे.

अर्जुनने आता चक्क मराठीचे धडे गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपटातील भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी अर्जुनने हे पाऊल उचललं आहे. सदाशिवराव भाऊ ही अतिशय विलक्षण भूमिका साकारण्यासाठी अर्जुनने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली असून सोबतच अस्खलित मराठी शिकण्यावरही त्याने भर दिला आहे.

वाचा : ..म्हणून मेघना गुलजारने थोपटली अमृता खानविलकरची पाठ

कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत या चित्रपटाची शूटिंग होणार असून तिथं शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आशुतोष गोवारिकरांच्या हस्ते नुकतंच त्याचं भूमिपूजन पार पडलं. या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत संजय दत्त आणि क्रिती सनॉन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.