‘रॉय’ हा चित्रपट आपल्यासाठी किमया करेल, या कल्पनेत अडकून पडलेल्या अभिनेता अर्जुन रामपालने आपला सगळा वेळ या एका चित्रपटामागे लावला होता. एवढेच नाही तर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याने आपला मानधनाचा आकडाही वाढवून घेतला. प्रत्यक्षात ‘रॉय’ला तिकीटबारीवर फारशी कमाल साधता आली नाही. आणि त्याचा उलट परिणाम अर्जुनच्या आगामी चित्रपटांवर झाला आहे. अर्जुनचे वाढीव मानधन परवडत नसल्याने त्याला चित्रपट सोडावा लागला आहे.
अभिनेत्री पूजा भट्टची निर्मिती असलेला आणि सोनी राझदान दिग्दर्शित करत असलेला ‘लव्ह अफेअर’ या चित्रपटात अर्जुन रामपालची मुख्य भूमिका असणार होती. कलकी कोचलिन, गुलशन देव्हिया आणि मोनिका डोग्रा असे कलावंत असलेल्या या चित्रपटात अर्जुन हेच सगळ्यात मोठे नाव होते. मात्र, ‘रॉय’च्या प्रसिद्धीदरम्यान अर्जुनने आपले मानधन वाढवले. अर्जुनच्या वाढीव मानधनामुळे चित्रपटाचे बजेट कोलमडून पडते आहे, असे कारण देत दिग्दर्शक सोनी राझदान यांनी अर्जुनला चित्रपटातून सोडचिठ्ठी दिली आहे. अर्जुनच्या ऐवजी सध्या ‘भट्ट’ कॅम्पचा लाडका ठरलेल्या अली फझलला नायक म्हणून पसंती देण्यात आली आहे.
खुद्द अलीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अलीच्या म्हणण्यानुसार, त्याला या चित्रपटासाठी चांगले मानधन मिळते आहे. शिवाय कलकी कोचलिनसारखी नायिका आणि सोनी राझदान यांच्यासारखी दिग्दर्शिका यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. अर्जुनने अवास्तव मानधनाची मागणी केली असल्यामुळेच त्याला चित्रपट सोडावा लागला आहे. अर्जुनने आपले मानधन वाढवल्यानंतर निर्मात्यांशी साधी बोलणीही केली नव्हती. कलाकारांनी मानधनावरून एवढा अभिमान बाळगणे योग्य नाही, अशी कानपिचकीही अलीने अर्जुनला दिली आहे.
पूजा भट्टनेही अलीच्या नावाची निश्चिती झाली असल्याचे म्हटले आहे. अर्जुनचे मानधन परडवणारे नसल्याने हा बदल करण्यात आला असल्याचे पूजाने स्पष्ट केले आहे. सध्या तरी ‘रॉक ऑन’ चित्रपटाचा सिक्वल हा अर्जुनच्या कारकिर्दीतला आत्ताचा महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो. पण अर्जुनला आगामी चित्रपटांसाठी आपल्या मानधनाचा पुनर्विचार करावा लागणार आहे.