उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर मराठी अभिनेता आरोह वेलकर याने संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक प्रकरणात तुम्ही व्यक्तीची जात मध्ये का आणता? असा सवाल करत त्याने पीडित तरुणीला न्याय द्या, अशी मागणी त्याने केली आहे.

अवश्य पाहा – “जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली”; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप

“प्रत्येक प्रकरणात तुम्हाला जात का दिसते? पीडित तरुणीच्या जातीबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही. कारण ती भारताची मुलगी होती. प्रत्येक स्त्री ही देशाचीच मुलगी असते. मला आणखी कशावरही विश्वास ठेवायचा नाही.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहून आरोहने आपला राग व्यक्त केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने पीडित तरुणीला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. यापूर्वी स्वरा भास्कर, कंगना रणौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख, अक्षय कुमार, हेमंत ढोमे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती.

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.