‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सीचा टास्क नुकताच झाला. किशोरी शहाणे कॅप्टन झाल्या आहेत. टास्कनंतर फावल्या वेळेत स्पर्धकांमध्ये चांगल्याच गप्पा रंगतात. अशाच गप्पांमध्ये आरोह वेलणकर नेहा शितोळेला ‘रेगे’ चित्रपटादरम्यानचा मजेशीर किस्सा सांगताना वूटच्या अनसीन अनदेखा व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.

आरोह नेहाला सांगतो, ”रेगे हा माझा पहिलाच चित्रपट होता. माझ्या शूटिंगचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मला जेलमध्ये मारहाण करतानाचा सीन होता. पहिल्‍याच दिवशी मला कॅमे-यासमोर सगळे कपडे काढून, कोंबडा करून उभा करतात आणि मारतात असा सीन शूट झाला.” यावर नेहाला हसू अनावर होतं. पुढे त्याने कशाप्रकारे व्यक्तिमत्त्वात बदल केला हे सांगितलं.

”मी जेव्हा मराठी इंडस्ट्रीत आलो तेव्हा अजिबात चांगला दिसत नव्हतो. दिसायला खूप बारीक होतो म्हणूनच रेगेमधील भूमिका मला मिळाली होती. ५२ किलो इतकंच माझं वजन होतं. त्यानंतर मी शरीरयष्टीवर काम करण्यास सुरूवात केली. रेगे ज्या वर्षी प्रदर्शित झाला त्याच वर्षी लय भारी आणि टाइमपास हे चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाले. त्यावेळी रितेशला मराठी पदर्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि मला रेगेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता.”

बिग बॉसच्या निमित्ताने कलाकारांचे बरेच किस्से ऐकायला मिळत आहेत. त्याचसोबत त्यांचा घरातील वावर आणि टास्कमध्ये दाखवलेली हुशारी ही शो जिंकण्यासाठी महत्त्वाची ठरतेय.