कुणी काहीही म्हणो, अचानक उंदीर दिसला की पळापळही होतेच. त्याचीही आणि आपलीही. अनेकांना उंदरांची भीती वाटते. पण त्या प्राण्याला इतकेही कळत नसेल की मांजराशिवाय दुसऱ्या कुणाला घाबरून पळायचे की नाही. कधी कधी तर तुम्ही त्याच्या अंगावर धावून गेलात की तो उलटा तुमच्या अंगावर धावून येतो. अशा उंदरांची भीती बॉलिवूड कलाकारांनाही वाटते. अभिनेता अर्शद वारसीला देखील उंदीरांचा प्रचंड राग येतो. तो दिसल्यानंतर काय करु आणि काय नको अशी अर्शदची परिस्थिती असते. मात्र अर्शद सध्या एका उंदराच्या प्रेमात पडला आहे. या उंदराचा व्हिडीओ अर्शदने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अर्शदने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे या उंदराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उंदीर त्याच्या अंगाला साबण लावून अंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून जे लोक उंदरांना घाबरतात ते लोकदेखील उंदरांच्या प्रेमात पडतील. ‘मला उंदरांचा प्रचंड राग येतो, पण या क्यूट उंदरामुळे मी असं म्हणू शकत नाही’ असे कॅप्शन अर्शदने व्हिडीओ शेअर करत दिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत ‘मुन्नाभाई ३’च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचेदेखील त्याने सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मुन्नाभाई आणि सर्कीटची धमाल पाहायला मिळणार हे नक्की. दरम्यान अर्शदने ‘गोलमाल ५’ हा गोलमाल सीरिजमधला चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. ‘सिम्बा’मध्ये गोलमाल टीमने कॅमिओ केला होता. त्यावेळीच ‘गोलमाल ५’चे संकेत रोहित शेट्टीने दिले होते. यावर आता अर्शदने शिक्कामोर्तब केला आहे.