डिजीटल प्लॅटफॉर्मचं महत्त्व वाढलं असून वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वेब सीरिजचं विश्व दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये बॉलिवूड आणि मराठी कलाकारही भूमिका साकारण्याची रुची दाखवत आहेत. आपल्या अप्रतिम अभिनयाने रुपेरी पडद्यासोबतच छोटा पडदा गाजवल्यानंतर अभिनेता अर्शद वारसी आता वूट ओरिजिनल्सच्या असूरा या वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे.

या सायकोलॉजिकल थ्रीलरमध्ये अर्शद डॉ. धनंजय ही भूमिका साकारणार आहे. पडद्यावर विनोदाचे उत्तम टायमिंग साधत या कलाकाराने आपले एक अढळ स्थान निर्माण केले. आता अर्शदला या वेगळ्या, नाट्यमय रुपात पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. या भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला, ‘समंजसपणा, हुशारी आणि अनुभवाच्या आधारावर धनंजय हा व्यक्ती बऱ्याच गोष्टींची उकल करतो. तो परफेक्शनिस्ट आहे. यासाठी तयारी करताना कार्यक्रमाच्या दिग्दर्शकासोबत व्यक्तिरेखा समजून घेणं हा मोठा भाग होता. त्यांच्यासोबत बराच काळ चर्चा केल्यानंतर प्रत्येक दृश्यातून, दिसणाऱ्या फ्रेममधून त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे मला समजू शकले. या कार्यक्रमाची टीम भन्नाट आहे आणि असूराचा एक भाग असल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.’

वाचा : सुपरहिट मल्याळम ‘अंगमली डायरीज’च्या मराठी रिमेकमध्ये दिसणार भूषण पाटील

वेब विश्वात पदार्पण करण्याबद्दल तो पुढे म्हणाला की, ‘डिजिटल जगात सर्जनशील पटकथांना, नवनव्या कथांना वाव आहे. त्यामुळे या जगाचा भाग होणे ही मोठी संधी आहे. यातून अभिनेत्यांना आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करून पाहण्याची, आपली क्षितीजे विस्तारण्याची संधी मिळते.’