नवरा-बायकोचं नातं हे नेहमीच अनेक अपेक्षांचं ओझं वाहणारं असतं. त्यातही भारतीय कुटुंबव्यवस्थेत हे नातं केवळ त्या दोघांतलंच असतं असं नाही, तर त्यात कुटुंब आणि नातलगांचाही समावेश असतो. नव्या सुनेला या सर्वाशी असलेलं आपलं वेगवेगळं नातं त्यातल्या अपेक्षांसह निभवावं लागतं. त्या पुऱ्या झाल्या नाहीत तर अपेक्षाभंगातून त्यांच्यात बेबनाव निर्माण होतो. या सगळ्या नात्यांचा ताण त्या स्त्रीवर तर असतोच; परंतु तिच्या नवऱ्यावरही असतो. कारण त्याच्याहीकडून पारंपरिक अपेक्षा असतात. त्याने एखाद् वेळी आपल्या बायकोची बाजू घेतली तर त्याचा गैर अर्थ काढला जातो, किंवा त्याने आपले कुटुंबीय वा नातलगांची बाजू घेतली की त्या उभयता नवरा-बायकोत संघर्ष उभा राहतो. त्यात दोघांचाही स्वभाव समंजस, समजूतदार नसेल, परस्परांना समजून घेण्याची वृत्ती नसेल तर हा संघर्ष टोकाला जातो आणि गोष्टी घटस्फोटापर्यंतही जातात. मात्र, काही वेळा या टोकाला जरी गोष्टी गेल्या नाहीत, तरी परस्परांबद्दल मनात अढी, निरगाठ निर्माण होतेच. मग ही ठुसठुसणारी वेदना अधूनमधून डोकं वर काढत राहते. संधी मिळेल तेव्हा एकमेकांना टोमणे देणं, खवचट बोलणं, चारचौघांत पाणउतारा करणं, मानसिक छळ या तऱ्हेनं हा सुप्त संघर्ष अधूनमधून झडत राहतो. या निरगाठी कधी कधी इतक्या घट्ट होतात, की पुढल्या आयुष्यात त्यापायी उभयतांचं जीवन कडूशार होऊन जातं.

या निरगाठी निर्माण होण्याकरता जे प्रसंग निमित्त ठरलेले असतात, त्यात त्या दोघांचे त्या प्रसंगांकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोणही बऱ्याचदा कारण असतात. त्यातलं तथ्य वेळीच समजून घेतलं वा समजावून दिलं गेलं नाही तर गैरसमजांत भर पडत जाते. तशात आपलं तेच खरं, हा हेका दोघंही ताणून धरू लागले तर रोषाचं विष आत आत भिनत जातं. त्यातून मनं दुभंगतात. अशी कलुषित मनं घेऊन परस्परांसोबत आयुष्य काढणं म्हणजे नरकाचाच अनुभव. अशाच एका उतारवयातल्या जोडप्याची गोष्ट शेखर ढवळीकरलिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘..के दिल अभी भरा नहीं!’मध्ये पाहायला मिळते.

अरुण निगवेकर हे अत्यंत खडतर परिस्थितीतून झगडत उद्योजक बनलेले गृहस्थ. निवृत्तीपश्चात बायको-मुलांसोबत निवांत आयुष्य जगायचं त्यांनी ठरवलेलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते निवृत्ती पत्करतात तेव्हा मुलगा आपल्या बायको-मुलासह परदेशी कायमसाठी स्थलांतरित झालेला असतो. म्हणजे उरले ते दोघं नवरा-बायको. बायको वंदनानं आयुष्यभर संसाराभोवतीच आपलं आयुष्य गुंफलेलं. आपल्या उद्योगव्यापांत आणि पुरुषप्रधान वृत्तीतून निगवेकरांनीही कायम बायकोला गृहीत धरलेलं. साहजिकच संसाराच्या धबडग्यात तिच्या मनात नवऱ्याविषयी कळत-नकळत अनेक निरगाठी निर्माण झालेल्या. त्यांचं त्या त्या वेळी निरसन न झाल्यानं त्या अधिकच पक्क्य़ा झालेल्या.

स्वाभाविकपणेच नवऱ्याच्या निवृत्तीनंतर वंदना आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधायला घराबाहेर पडते. त्यामुळे घरात एकटे पडलेले निगवेकर अस्वस्थ होतात. बायकोशी जमवून घ्यायचे, तिला समजून घ्यायचे, मिळालेल्या मोकळिकीमुळे तिला घरकामांत मदत करण्याचे त्यांचे प्रयत्न तिच्या मनातील अढीमुळे व्यर्थ ठरतात. आधीच्या अनुभवांतून तिनं त्यांच्या प्रत्येक कृतीचे, वागण्याचे काढलेले गैर अर्थ त्यांच्यावर अन्याय करणारे असले तरी ते त्याबद्दल काहीही करू शकत नाहीत. ते हतबल होतात. तरीही आपले प्रयत्न ते जारी ठेवतात. त्यांचे शेजारी मेढेकर त्यांना आपले अनुभवाचे बोल ऐकवतात खरे; पण त्यानंही परिस्थितीत फरक पडत नाही. दोघांतला तणाव वाढतच जातो. बायकोला गृहीत धरण्याचे परिणाम या टोकाला जातील असं त्यांना कधी वाटलेलं नसतं. आता यातून बाहेर कसं पडावं हे त्यांना कळत नाही. हताश, उद्विग्न मन:स्थितीत आला दिवस ते ढकलत राहतात..

भूतकाळात हातून कळत-नकळत घडलेल्या (वा न घडलेल्याही!) चुकांचं परिमार्जन करण्याची संधी निगवेकरांना मिळते का? घडल्या गोष्टींना ते एकटेच जबाबदार असतात? मग शिक्षा फक्त त्यांनाच का?.. असे अनेक प्रश्न नाटक पाहणाऱ्याला पडतात. अर्थात या प्रश्नांची उत्तरं नाटकात अखेरीस सापडतातही. वंदनाही मान्य करते, की कुठली गोष्ट धरून ठेवायची आणि कुठली तिथंच सोडून द्यायची, हे मलाही तेव्हा कळलं नाही. तर ते असो.

लेखक शेखर ढवळीकर यांनी नवरा-बायकोत कळत-नकळत निर्माण होणाऱ्या निरगाठींचं आणि भविष्यातील त्याच्या परिणामांचं हे नाटक ठाय लयीत खुलवत नेलं आहे. उभयतांमध्ये इतक्या वर्षांच्या साकळलेल्या सुप्त ताणतणावांचं विरेचन करताना त्यात आक्रस्ताळेपणा येणार नाही याचीही दक्षता त्यांनी घेतली आहे. म्हणजे काहीएक मर्यादेपर्यंत निगवेकरांना लेखकानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असलं तरी त्यांना खलपुरुष मात्र ठरवलेलं नाही. तीच गोष्ट वंदनाच्या बाबतीतही. तिनं नवऱ्याविरोधात बंड पुकारलं असलं तरी त्याला शत्रू मानलेलं नाही. तिचा लढा आहे तो स्व-अस्मितेसाठीचा! त्याची झळ आजवर पुरुषप्रधान मानसिकतेत आयुष्य व्यतीत केलेल्या निगवेकरांना बसणं स्वाभाविकच. उतारवयात नवऱ्याच्या चुका व दोषांचे हिशेब चुकते करण्याचा नाटय़पूर्ण आव नाटकात नाहीए. तर बायकोच्या स्व-ओळखीच्या शोधामुळे नवऱ्याला आपल्या हातून घडलेल्या चुकांची जाणीव होणं, इतपतच तिचं हे बंड आहे. अर्थात चुका तिच्याही हातून घडल्या आहेत. त्या- त्या प्रसंगांचं तिचं त्यावेळचं आकलन आणि त्या घटनांचे तिनं काढलेले अर्थ योग्यच आहेत, हा तिचा हेकाही किती चुकीचा होता, हे तिच्याही शेवटी लक्षात येतं आणि आयुष्यभर उराशी बाळगलेल्या कटु निरगाठी अकस्मात सुटतात. आभाळ निरभ्र होतं.

हा सारा प्रवास लेखकानं ठाय लयीतील बंदिशीसारखा नाटकात मांडला आहे. मनुष्यस्वभावातील कंगोरे, त्यातून कळत-नकळत दुखावली जाणारी मनं आणि त्याचे होणारे दुरगामी परिणाम दाखवणारं हे नाटक. लेखकाची शैली काहीशी कानेटकरी वळणाची असली तरी त्यात संयततेचा धागा अढळ राहिला आहे. नाटकातलं मेढेकर हे पात्र काहीसं चाकोरीतलं वाटलं तरी त्यास प्रयोजन आहे. बाळबोध असलं, तरी! मात्र, निगवेकरांच्या मुलीला- राधिकाला यात कुठलीच ‘भूूमिका’ नाहीए. लेखकानं यातल्या मुख्य व्यक्तिरेखा मात्र ठाशीवपणे चितारल्या आहेत. त्यांच्यातला संघर्ष संयमित असला, तरी खचितच धारदार आहे. या संघर्षांतले छोटे छोटे नाटय़मय क्षण त्यांनी अचूक टिपले आहेत. अल्पाक्षरी संवादांतून सणसणत येणाऱ्या बाणासारखे ते अचूक लक्ष्यवेध करतात.

दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाटकाचा मध्यवर्ती गाभा जाणून घेत कमीत कमी हालचालींत, संवादांतील आघात, आरोह-अवरोह जाणून घेत, आवश्यक तेथे नि:शब्दतेतून आणि लूक्समधून नाटक अर्थवाही केलं आहे. विशेषत: निगवेकर आणि त्यांच्या बायकोच्या क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांचा त्यांनी खोलात विचार केला आहे. पण राधिकाच्या नाटकातील असण्याला मात्र ठोस कारण सापडत नाही. एकूण प्रयोगाचा संयतता हा स्थायीभाव आहे. संयमिततेतलं ‘नाटय़’ अधोरेखित करण्यात ते यशस्वी झाले आहेत. ही बाब खचितच सोपी नाही. त्याबद्दल मंगेश कदम यांना दाद द्यायलाच हवी. विशेषत: विक्रम गोखले आणि रीमा यांच्या पिंडप्रकृतीशी फटकून त्यांना सादर करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे आणि ते यशस्वी करूनही दाखवलं आहे. नाटकीपणाचे मोहक क्षण त्यांनी कटाक्षानं टाळले आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं.

प्रदीप मुळ्ये यांनी एका उद्योजकाचं प्रशस्त घर साकारताना पात्रांना मोठा अवकाश उपलब्ध करून दिला आहे. मोजक्या पात्रांच्या नाटकात तो भरून काढणं हे कलाकारांसमोरचं आव्हान असतं. विक्रम गोखले आणि रीमा यांनी आपल्या दीर्घानुभवातून ते सहजगत्या पेललं आहे. रवि करमरकर यांची प्रकाशयोजना आणि साई पियुष यांच्या संगीतानं नाटकाचा मूड सांभाळला आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं काहीएक नियोजन मनाशी केलेल्या निगवेकरांची बायकोच्या आकस्मिक वेगळ्या पवित्र्यानं झालेली गोची, त्यातून आलेली अस्वस्थता, हताशा, चिडचीड, भांबावलेपण आणि कुंठितावस्था विक्रम गोखले यांनी उत्कटतेनं व्यक्त केली आहे. मधूनच डोकं वर काढणारा त्यांचा पुरुषी अहंकार व त्याला काबूत ठेवताना होणारी त्यांची तारांबळ बघणीय. हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीतल्यासारखं आयुष्यातल्या प्रसंगांकडे पाहण्याच्या प्रत्येकाच्या विभिन्न दृष्टीमुळे कशा निरगाठी निर्माण होतात, हेही यानिमित्तानं समोर येतं. पण याचा विचार सहसा माणसं करत नाहीत. आपलं तेच खरं मानत राहतात. त्यातूनच मग पुढचं रामायण घडतं. हा संदेश नाटकात अधिक ठाशीवपणे व्यक्त होता तर बरं झालं असतं. रीमा यांनी वंदनाची बंडखोरी कुठल्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता संयमितपणे व्यक्त केली आहे. मनातली चीड व्यक्त करतानाही त्या ज्या थंड अलिप्तपणे वागतात, त्याला तोड नाही. त्यानं उभयतांतला संघर्ष आणखीनच टोकदार होतो. नवऱ्याला थेटपणे न बोलता त्याला बोचकारण्याचं, दुर्लक्षानं आणि उपेक्षेच्या कटाक्षानं गलितगात्र करण्याचं त्यांचं टेक्निक लाजवाब! अद्वातद्वा न भांडताही समोरच्याला गारद कसं करता येतं याचा तो वस्तुपाठ ठरावा. रीमा यांची अभिनेत्री म्हणूनची उच्चतम यत्ता त्यातून कळून येते. जयंत सावरकर हे अष्टपैलू नट आहेत, यावर मेढेकरांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतं. बागेश्री जोशीराव यांना राधिकाच्या भूमिकेत करण्यासारखं काही नव्हतंच. यात अर्थातच त्यांना दोष देता येणार नाही.

उतारवयातल्या जोडप्याचं ठाय लयीतलं संघर्षमय उत्तरायण दाखवणारं ‘..के दिल अभी भरा नहीं!’ प्रत्येकानं एकदा तरी अनुभवावंच.