15 December 2019

News Flash

पुन्हा एकदा रीमिक्स..

सध्याचा डिजिटल जमाना आहे तो फ्युजनचा. म्हणजेच दोन गोष्टी एकत्र करून त्यापासून नवीन काहीतरी निर्माण करण्याचा.

(संग्रहित छायाचित्र)

स्वप्निल घंगाळे

रीमिक्स म्हटल्यावर पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे डीजे. सामान्यपणे एखाद्या मूळ गाण्यामध्ये बदल करून तेच नव्याने सादर करण्याच्या ट्रेण्डला रिमिक्स म्हणतात. तर जुने गाणे तसेच ठेवून ते नव्याने चित्रित करण्याला रिमेक किंवा रिक्रिएशन म्हणतात. रिमिक्सकडे मध्यंतरी श्रोत्यांनी पाठ फिरवली होती. मात्र आता चित्र पुन्हा बदलले असून श्रोते रिमिक्स गाण्यांच्या प्रेमात पडल्याचे चित्र दिसत आहे. सध्या हिंदी तसेच मराठी सिनेमांमध्येही जुन्या गाण्यांची चलती आहे. याच रिमिक्स आणि रिमेक गाण्यांच्या ट्रेण्डवर टाकलेली नजर..

सध्याचा डिजिटल जमाना आहे तो फ्युजनचा. म्हणजेच दोन गोष्टी एकत्र करून त्यापासून नवीन काहीतरी निर्माण करण्याचा. गाण्यांच्या क्षेत्रातही अशाप्रकारे दोन गोष्टी एकत्र करून भन्नाट काहीतरी तयार करण्याच्या ट्रेण्डलाच रिमिक्स असं म्हणतात. सध्या तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला काही ठरावीक गाणीच ऐकायला मिळतील. ‘आँख मारे ओ लडकी’, ‘दिलबर दिलबर’, ‘मोरनी बनके ’, ‘मेरे रश्के कमल’ अशी ठरावीक गाणी अनेकांच्या भ्रमणध्वनीमध्ये किंवा प्ले लिस्टमध्ये आहेत. ही गाणी वेगवेगळ्या चित्रपटांमधील असली तरी त्यांच्यातील एक महत्त्वाचे साम्य म्हणजे ही गाणी आधीच्या मूळ गाण्यांपासून तयार करण्यात आली आहेत. म्हणजेच ती जुन्या गाण्यांपासून तयार केलेली रिमिक्स आहेत. तर दुसरीकडे जुन्याच गाण्यांमध्ये काही बदल न करता ती नवीन कलाकारांसोबत चित्रित करून चित्रपटात वापरली जातात. यालाच रिमेक गाणं असे म्हटले जाते.

आज अनेक पाटर्य़ामध्ये किंवा भ्रमणध्वनीवरील गाण्यांच्या अ‍ॅप्सवर झळकणारी अव्वल गाणी ही रिमिक्स आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर ‘विंक’ या गाण्यांच्या अ‍ॅपने जारी केलेल्या २०१८ मधील मुंबईकरांनी सर्वाधिक ऐकलेल्या गाण्यांच्या यादीमध्ये ‘दिलबर दिलबर’ हे ‘सत्यमेव जयते’ सिनेमातील गाणं पहिल्या क्रमांकावर आहे. खरं तर हे मूळ गाणं १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिर्फ तुम’ चित्रपटातील आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मूळ गाणं सुष्मिता सेन आणि संजय कपूरवर चित्रित करण्यात आलं होतं. एवढं आश्चर्यचकित होऊ  नका खरी मजा तर पुढे आहे. सध्या जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी ऐकू येणारं गाणं म्हणजे ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँख मारे ओ लडकी’ हे गाणं १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातील आहे. हे गाणं अर्शद वारसी आणि प्रिया गिल यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. अशी गाण्यांची एक मोठी यादीच होऊ  शकते जी जुन्या चित्रपटातील मूळ गाण्यांमध्येच बदल करून रिमिक्स म्हणून सादर केली जात आहेत. मागील दोन वर्षांमध्येच ५०हून अधिक जुन्या गाण्यांचे रिमिक्स व्हर्जन सिनेमांमध्ये वापरण्यात आले आहेत. २०१८ मधील लोकप्रिय गाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास ‘दिलबर दिलबर’, ‘आँख मारे ओ लडकी’, ‘आशिक बनाया आपने’ (मूळ चित्रपट : आशिक बनाया आपने, २००५), ‘मोरनी बनके’ (राजेंद्र सिंग राय यांनी २०१० गायलेले गाणे), ‘सानू एक पल चैन ना आवे’ (नुसरत फतेह अली खान यांनी १९९३ साली प्रदर्शित झालेल्या मैफील-ए-समा अल्बममध्ये गायलेले) या गाण्यांची नावे घ्यावी लागतील.

हिंदी चित्रपटात मागील काही वर्षांमध्ये रिमिक्स करण्यात आलेल्या यशस्वी गाण्यांवर नजर टाकल्यास ‘लैला मैं लैला’ (रईस, मूळ सिनेमा- कुर्बानी १९८०), ‘हम्मा हम्मा’ (ओके जानू, मूळ सिनेमा- बॉम्बे १९९५), ‘तम्मा तम्मा’ (बद्री की दुल्हनिया, मूळ सिनेमा- थानेदार १९९०), ‘तू चिज बडी है मस्त’ (मशीन, मूळ सिनेमा- मोहरा १९९४), ‘मैं तेरा बॉयफ्रेण्ड’ (राबता, मूळ गाणे- २०१५ मध्ये एका पंजाबी अल्बममधील), ‘हवा हवा’ (मुबारखान, मूळ गाणे १९८०च्या दशकात हसन जहांगीर यांनी गायलेले), ‘मेरे रश्के  कमल’ (बादशाओ, मूळ गाणे- नुसरत फतेह अली खान यांनी १९८८ साली गायलेले), ‘आजा आजा दुल्हे राजा, चलती है क्या नौ से बारा’ (जुडवा टू, मूळ सिनेमा- जुडवा १९९७), ‘हवा हवाई’ (तुम्हारी सुलू, मूळ सिनेमा- मिस्टर इंडिया, १९८७), ‘बन जा तू मेरी रानी’ (तुम्हारी सुलू मूळ गाणे गुरू रंधावाने २०१६ मध्ये गायलेले), ‘हंगामा हो गया’ (क्वीन, मूळ सिनेमा- अनहोनी १९७३) या गाण्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

एकीकडे असे असतानाच सर्वच रिमिक्स केलेली गाणी यशस्वी ठरलेली नाहीत हेही तितकेच खरे. २०१७ साल हे रिमिक्स गाण्यांसाठी म्हणावे तितके उत्साहवर्धक ठरले नाही. त्या तुलनेत मागील वर्षी रिमिक्स गाणी श्रोत्यांनी स्वीकारली, वाजवली आणि गाजवलीही. फारसा प्रभाव न पाडू शकणाऱ्या रिमिक्स गाण्यांची नावे घ्यायची झाल्यास त्यामध्ये ‘सारा जमाना’ (काबील, मूळ सिनेमा- याराना, १९८१), ‘मैने तुझ को देखा’ (गोलमाल अगेन, मूळ सिनेमा- इश्क, १९९७), ‘गुलाबी आँखे’ (नूर, मूळ सिनेमा- द ट्रेन, १९७०), ‘कावा कावा’ (लखनौ सेंट्रल, मूळ सिनेमा- मान्सून वेडिंग्स, २००१), ‘पल्लो लटके हा मारो’ (शादी में जरुर आना, मूळ सिनेमा- नौकर, १९७९), ‘कह दू तुम्हें’ (बादशाओ, मूळ सिनेमा- दिवार, १९७५), ‘ओ मेरी मेहबुबा’ (फुंकरे रिटर्न्‍स, मूळ सिनेमा- धरम वीर, १९७७), ‘लग जा गले’ (बॉम्बे टॉकीज, मूळ सिनेमा- वो कौन थी, १९६४), ‘दुनिया में लोगो को धोका’ (वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, मूळ सिनेमा- अपना देश, १९७२), जाता कहां है दिवाने (बॉम्बे वेल्वेट, मूळ सिनेमा- सीआयडी, १९५६), अजिब दास्ता हैं ये (बॉम्बे टॉकीज, मूळ सिनेमा- दिल अपना और प्रीत परायी, १९६०) नावे घ्यावी लागतील.

रिमिक्स करण्याचा हा कल भविष्यातही सुरू राहणार असल्याचे दिसत आहे. याचेच एक उदाहरण घ्यायचे झाल्यास आगामी ‘एक लडकी को देखा तो ऐसे लगा’ चित्रपटात हे टायटल ट्रॅक रिमिक्स करण्यात आले आहे. हे गाणंही अनेकांना भावलं आहे हे विशेष. थोडक्यात सांगायचं तर जुनी गाणी रिमिक्स/रिमेक म्हणून श्रोते स्वीकारू लागले आहेत गरज आहे फक्त ते योग्य पद्धतीने सादर करण्याची.

हिंदीमध्ये रिमिक्स गाण्यांना श्रोते स्वीकारू लागले असले तरी मराठीमध्ये हा प्रयोग होताना दिसत नाही. मराठीमध्ये रिमिक्सऐवजी रिमेकवर जास्त भर देण्यात येत असल्याचे चित्र मागील वर्षभरापासून दिसत आहे. ‘मुंबई पुणे मुंबई ३’ मध्ये ‘गं साजनी’ असो किंवा याच सिनेमात अनेकदा प्रशांत दामलेंनी गुणगुणलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ गाणं असू द्या. जुनी गाणी जशीच्या तशी नव्या सिनेमांमधून मराठी श्रोत्यांना ऐकायला मिळत आहेत. याशिवाय मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमामध्येही अनेक जुन्या गाण्यांचे रिमेक नवीन कलाकारांना घेऊ न जसेच्या तसे चित्रित करण्यात आले होते. यामध्ये ‘गं साजणे’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ या गाण्यांचा समावेश होतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ सिनेमामध्येही ‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणं पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

First Published on January 20, 2019 1:31 am

Web Title: article about again remix remake songs
Just Now!
X