वादविवाद आणि हो-नाहीच्या तालावर रखडलेला नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाच्या चित्रीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. हा चित्रपट मराठीजनांसाठी आणि एकूणच सगळ्याच अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागराज यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार असून या पहिल्या हिंदी चित्रपटात त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकार खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करता येणार आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले असल्याने झुंडबद्दल लोकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे.

झुंड या चित्रपटाबद्दल फक्त लोकांनाच नाही तर अमिताभ बच्चन यांच्याही मनात हा चित्रपट कसा आकाराला येईल याबाबत उत्सुकता असल्याचे दिसून येते आहे. चित्रपटासाठी सध्या नागपुरात असलेल्या अमिताभ यांनी चित्रीकरणादरम्यानची काही छायाचित्रे आपल्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध केली आहेत. झुंड हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचे सांगण्यात येते. अमिताभ त्यांची भूमिका करणार असेही बोलले जात असले तरी या चित्रपटाबद्दल कुठलेच तपशील अधिकृतपणे बाहेर आलेले नाहीत. झुंड या चित्रपटासाठी आपण नागपूर येथे आहोत, असे अमिताभ यांनी समाजमाध्यमांवर सांगितले आहे. मराठीत ‘सैराट’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे आणि भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यवर्ती असलेले नागपूरसारखे आकर्षण केंद्र अशी दोन आकर्षण केंद्रे एकत्र आल्याने काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, असा विश्वासही अमिताभ यांनी व्यक्त केला आहे.