26 September 2020

News Flash

पडद्यामागील कलाकार

बॅकस्टेजचा आमचा चमू खूप मोठा आहे. प्रत्येकाची काही ना काही विशेष खासियत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमात पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांइतकेच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचे (बॅक स्टेज आर्टिस्ट) योगदान खूप महत्वाचे असते. पडद्यामागे काम करणाऱ्या या कलाकारांमुळेच नाटकाचा प्रयोग किंवा चित्रपट-मालिका चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचत असतो. नाटकाचा प्रयोग सादर होत असताना पडद्यामागच्या या सर्व कलाकारांना अधिक सावध राहून काम करावे लागते. नाटकाचा प्रयोग व्यवस्थित पार पडणे किंवा प्रयोगच ‘पडणे’ हे या पडद्यामागच्या कलाकारांच्या हातात असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने एकांकिकेत पडद्यामागे तारेवरची कसरत लिलया पार पाडणाऱ्या पडद्यामागील काही तरुण कलाकारांशी साधलेला हा संवाद..

रंगभूमीचे जगणे अनुभवले

ज्या ठिकाणी तालीम करणार आहोत त्या जागेची साफसफाई करणे, नेपथ्याची प्राथमिक तयारी करून ठेवणे आणि अन्य बरीच छोटी-मोठी कामे पडद्यामागचे कलाकार करत असतात. आमच्याकडे दहा ते बारा जण हे काम करत आहेत. तालमींचे वेळापत्रक सांभाळणे, कलाकारांसाठी पाणी भरून ठेवणे, कोणती वस्तू कमी पडत असेल तर बाजारात जाऊन ती विकत घेऊन येणे, कपडय़ांची जमवाजमव, नेपथ्यासाठी महाविद्यालयातून टाकाऊ वस्तू शोधणे या गोष्टी करत असताना ती कलाकृती प्रत्यक्ष जगता येते. दोन वर्षे ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळीही पडद्यामागील कामामुळे रंगभूमीचे जगणे अनुभवले. रंगमंचासाठी जितकी मदत  करतो तितकेच प्रेम ही रंगभूमी माझ्यावरही करते असे मला वाटते. पडद्यामागील काम करताना अभिनयाचे धडेही घेता येतात.

सिद्धांत खरे, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर

‘कमी खर्च करण्यावर भर’

बॅकस्टेजचा आमचा चमू खूप मोठा आहे. प्रत्येकाची काही ना काही विशेष खासियत आहे. कोणी चित्र उत्तम काढतो, कोणाला तांत्रिक गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करता येतात तर आमच्यातीलच काही जण सेट उभारण्याचे काम करतात. प्रत्येकाला काय करायचं आणि कसं करायचं ते माहीत असतं. काही वेळेस आमचा सर्व चमू आठ ते दहा तासही विश्रांती न घेता काम करतो. दिवसभराच्या कामाचे जे नियोजन केलेले असते ते पूर्ण केले जाते. कमीत कमी खर्च करुन जास्तीत जास्त चांगले कसे करता येईल त्यावर विशेष भर असतो.

-शंतनू सहस्रबुद्धे, स.प. महाविद्यालय, पुणे

‘वेळेचे व्यवस्थापन शिकालो’

बाहेरगावी प्रयोगाला जाताना संपूर्ण चमू बसू शकेल अशा बसगाडीची व्यवस्था करतो. प्रवासात सेटचे नुकसान होऊ  नये म्हणून तो ताडपत्रीने व्यवस्थित बांधून नेला जातो. या सगळ्यासाठी जो काही खर्च येणार असेल त्याचा  आधीच अंदाज काढतो आणि त्याची माहिती महाविद्यालयाला देतो. शक्यतो कमीत कमी खर्च केला जातो.यंदा पहिल्यांदाच नियोजनाची सर्व जबाबदारी माझ्याकडे आहे. या आधी जे नियोजक म्हणून काम करत होते त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. विशेषकरुन वेळेचे व्यवस्थापन आणि वक्तशीरपणा मी शिकलो.

-निखिल कदम, गरवारे महाविद्यालय, पुणे

‘पडद्यामागील चमूची भूमिका महत्वाची’

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत डीबीजे महाविद्यालयातर्फे गेली सलग तीन वर्षे सहभागी होत आहे. २०१६ मध्ये या स्पर्धेमध्ये सादर झालेल्या ‘तात्यांची कृपा’ या एकांकिकेत भूमिका केली होती. ते काम करत असतानाच  बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून विविध प्रकारची मदत लागत असते याची जााणीव झाली आणि इतर काही ज्येष्ठ मित्रांबराबर या कामातही लक्ष घालायला लागलो. स्पर्धेसाठी एकांकिका निवडल्यानंतर दिग्दर्शकाच्या सूचनांनुसार सेटचा आराखडा तयार करणे, तयार झालेला सेट रंगवणे, प्रयोगामध्ये आवश्यक वस्तूंची जमवाजमव करणे या बाबींकडेही लक्ष पुरवावे लागते. एकांकिका बसवत असताना तालमीच्या वेळी सर्वजण पडेल ते काम करत असतात. एकांकिका प्रत्यक्ष स्पर्धेत सादर होत असताना काहीजण कलाकाराच्या भूमिकेत रंगमंचावर असतात तर काही जण पडद्यामागे राहून काम करत असतात. दोन दृश्यांमधील अंधारात काही सेकंदांमध्ये रंगमंचावर पुढील प्रसंगानुसार वस्तूंची मांडामांड करणे, सेट बदलणे या गोष्टी चपळाईने आणि बिनचूकपणे कराव्या लागतात. एकांकिकेच्या सेटबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आम्ही तो तालमीच्या सभागृहातील रंगमंचाच्या लांबी-रुंदीनुसार तयार केलेला असतो पण प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी तेथील रंगमंचाच्या आकारमानानुसार त्यात ऐनवेळी काही बदल करावे लागतात. हे आयत्या वेळचे काम खूप आव्हानात्मक असते. काही वेळा रंगमंचावर उभारलेला सेट किंवा त्यातली एखादी चौकट कलाकारांच्या हालचालींमुळे पडू नये म्हणून संपूर्ण प्रयोग संपेपर्यंत धरुन उभे राहावे लागते तर काही वेळा रंगमंचावरील लेव्हल्सच्या आड लपून हालचाली कराव्या लागतात. रंगमंचावरच्या परिणामकारक सादरीकरणासाठी पडद्यामागची ही फौज खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

-सुदर्शन धामणसकर, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:16 am

Web Title: article about artist behind the scenes
Next Stories
1 निक आला मांडवापाशी..
2 रजनीकांतच्या ‘२.०’ चित्रपटाची दोन दिवसांत शंभर कोटींची कमाई
3 वेबवाला : व्यापार, साम्राज्यविस्तार आणि स्वातंत्र्य
Just Now!
X