15 October 2019

News Flash

कलाकारांची गोष्ट..!

‘गल्ली बॉय’ चित्रपटाबद्दल बोलतानाही त्याची कथा महत्त्वाची असल्याचं ती सांगते.

झोया अख्तर

‘गल्ली बॉय’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. समाजमाध्यमांवरच काय, गल्ली गल्लीमध्ये या चित्रपटाची चर्चा आहे. झोपडपट्टीतला एक मुलगा रॅपर होण्याचं म्हणजेच संगीतातून व्यक्त होत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडतोय आणि एक मुस्लीम मुलगी परंपरेने बांधलेल्या साखळदंडांना हादरे देत पुढे जायचा प्रयत्न करतेय. अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या तोंडी असलेले कडक, दमदार असे या चित्रपटातील संवाद व्हायरल होत आहेत. हा चित्रपट ‘डिव्हाइन’ आणि ‘नॅझी’ या शून्यातून वर आलेल्या प्रसिद्ध रॅपरच्या आयुष्यावर आधारित आहे. एकदम तळागाळातलं संगीत तळ ढवळल्यासारखं आपल्या अंगात भिनतंय की काय असं या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना वाटतं. या सगळ्याची कर्तीकरविती असलेली दिग्दर्शक झोया अख्तर हिच्या मते ही खरी कलाकारांची गोष्ट आहे आणि अशा गोष्टी ऐकायला प्रेक्षक आतुर आहेत.

‘गल्ली बॉय’ या चित्रपटाची सध्या ‘स्ट्रेट ओटा कॉम्प्टन’, ‘नोरोरियस’, ‘गेट रिच अँड डाय ट्रीन’, ‘फ्रायड’, ‘एट माईल’ यांसारख्या हिप-हॉप, रॅप कल्चरला वाहिलेल्या चित्रपटांशी तुलना होतेय. ६९ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. त्यामुळे सर्व स्तरांतील प्रेक्षकांना आवडेल आणि त्याचबरोबर चित्रपट महोत्सवातूनही तो जगभरातील प्रेक्षकांची दाद मिळवेल, असं या चित्रपटाबद्दल बोललं जाऊ लागलं आहे. या सगळ्या गोष्टी दिग्दर्शक म्हणून झोया अख्तरला नक्कीच सुखावणाऱ्या आहेत. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यापासून दिग्दर्शक म्हणून तिने आपली ओळख आपल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपटांतून निर्माण केली. ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘दिल धडकने दो’, ‘लस्ट स्टोरीज’मधील एक कथा आणि त्यानंतर येणारा झोयाचा ‘गल्ली बॉय’ हा चित्रपट. या सगळ्याच चित्रपटांनी तिला सशक्त विषय हाताळणारी दिग्दर्शक म्हणून लौकिक मिळवून दिला आहे. ‘गल्ली बॉय’ हाही तिच्याच शैलीतला चित्रपट आहे.

‘गल्ली बॉय’ चित्रपटाबद्दल बोलतानाही त्याची कथा महत्त्वाची असल्याचं ती सांगते. मात्र हा ‘डिव्हाइन’ आणि ‘नॅझी’ या रॅपर्सचा चरित्रपट नाहीये, तर ती खऱ्या गोष्टीची जोड दिलेली काल्पनिक गोष्ट आहे, हेही तिने स्पष्ट केले. ते दोघेही आमच्या चित्रपटाबरोबर जोडले गेले आहेत. त्यांनी रणवीरची भूमिका आपली वाटावी, खरी उतरावी यासाठी मेहनत घेतलीये. त्यांच्या आजवरच्या प्रवासातील अनुभवाचे बोल त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांचा संघर्ष, अनुभव यातून हा चित्रपट आकारास आला आहे. त्यांची कथा सांगताना त्यांनी अक्षरश: मला त्या विश्वात नेलं होतं. एक लेखक म्हणून मला ती कथा जास्त भावली आणि ती मी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे, असं ती म्हणते. ही गोष्ट फक्त तरुणाईसाठी नाही, ती पाहणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही देऊन जाईल.

‘दिल धडकने दो’ आणि ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ या चित्रपटांमुळे उच्चभ्रू वर्गाची गोष्ट मांडणारी झोया अशी तिची प्रतिमा निर्माण झाली होती, पण ‘गल्ली बॉय’चा ट्रेलर पाहून त्यात तळागाळातील मुलांची धडपड पाहायला मिळते आहे आणि ती तितक्याच वास्तव पद्धतीने मांडलेली दिसते आहे, अशा प्रतिक्रिया तिच्यापर्यंत पोहोचल्या. प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया ऐकून खरं तर मला खूप आश्चर्य वाटलं, असं तिने सांगितलं. मी केवळ उच्चभ्रू वर्गासाठी चित्रपट बनवते, सर्वसामान्यांसाठी नाही, असा निष्कर्ष प्रेक्षकांनी का काढला? असं काही नाही. मला जी गोष्ट मनापासून मांडायची असते ती मी मांडतेच, असं तिने स्पष्ट केलं. माझ्या चित्रपटांची परखड समीक्षा केली जाते तेव्हा त्यातूनही मी सतत शिकते, असं सांगतानाच क धी कधी त्यांनी आपल्याबद्दल मांडलेली मतं समजतही नाहीत, असंही ती मनमोकळेपणाने सांगते. ‘‘उच्चभ्रूंचे विषय, त्यांची सुख-दु:खंच तेवढी मांडते वगैरे असं काही नाही. मी असं वेगळं काही मानतच नाही. मला स्वत:ला ज्या गोष्टी आश्चर्यचकित करतात त्या गोष्टी मला चित्रपटातून सांगायला आवडतात,’’ असं ती म्हणते. ‘गल्ली बॉय’ हे रूढ चित्रपटांपेक्षा वेगळं काही देण्याचं धाडस आहे का? यावर मी काही तरी सिद्ध करायचं आहे म्हणून हा विषय मांडत नाहीये, तर तो खरा आहे आणि आतला आवाज मांडणारा विषय आहे. म्हणून त्याची निवड केली असल्याचं तिने सांगितलं.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंगची निवड का करावीशी वाटली? यावर रणवीरबद्दल विचार करताना तो सगळ्यांना चंचल स्वभावाचा कलाकार वाटतो; पण तो खूप हळवा आणि तितकाच समजूतदार कलाकार आहे. त्याला कुठे काय करायचं आहे, नेमकं कुठे थांबायचं आहे, आपल्यातील ऊर्जा त्या भूमिके ला कशी द्यायची आहे हे पक्कंठाऊक असतं. त्यामुळे तो वरवर उतावळा, कायम हसत-हसवत असलेला असा दिसला तरी प्रत्यक्षात तो वेगळा आहे, असं सांगतानाच त्याला दिग्दर्शक म्हणून हसण्यावारी घेणारा वाटला तरी तो तितकाच भावुक आहे, समजूतदार आहे. त्याला दिग्दर्शक म्हणून हाताळणं कठीण आहे वगैरे अशा चर्चा का रंगतात कळत नाहीत, असंही ती म्हणाली. पुन्हा मूळ कथेच्या मुद्दय़ाकडे येत झोया म्हणाली, ‘‘डिव्हाइन आणि नेझी यांचं २०१४ मध्ये एक गल्ली रॅप गाणं मी ऐकलं होतं. ते माझ्या मनात इतक्या वेळा घोळत राहिलं की, त्याचे विचार डोक्यातून जाईनात. अखेर तो विचार चित्रपटातून प्रत्यक्षात उतरला आहे.’’

‘गल्ली बॉय’ चित्रपटामुळे अशा पद्धतीने संगीत सादर करणाऱ्या गल्लीबोळातील रॅपर्सना एक विश्वास आणि कलेला ओळख मिळेल. ही सच्च्या कलावंतांची गोष्ट असून त्यांचा आवाज दबलेला असला तरी त्यांच्यातही पेटून उठण्याची ऊर्जा आहे. जगण्याला ताल देणारी अभिव्यक्ती ते गाण्यातून व्यक्त करतात. ही त्यांची गोष्ट आहे. अर्थात हा चित्रपट कुठल्याही दृष्टीने रॅप संगीताचा प्रचारपट नाही. त्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. यात महत्त्वाची आहे ती त्या माणसांची गोष्ट आणि तीच शेवटी आपल्याला जगण्याचा अर्थ देऊन जाते.

रीमा कागती आणि मी चित्रपटाची पटकथा लिहायला घेतल्यावर जाणवू लागलं की, ही खऱ्या आयुष्यातील प्रामाणिक गोष्ट आहे. त्या व्यक्तिरेखांभोवती असलेले समाजव्यवस्थेचे आणि आर्थिक बंधनांचे पाश त्यांना भेदायचे आहेत आणि त्यातून ते स्वत:ला घडवू पाहत आहेत. या गोष्टीत सकारात्मकता, आशावाद आणि काही तरी वेगळं करून दाखवण्याची आणि जग बदलण्याची जिद्द होती. या गोष्टी मला जास्त आवडल्या, महत्त्वाच्या वाटल्या आणि त्या त्या व्यक्तिरेखांमधून ते मांडण्याची संधी चित्रपटातून मिळाली.

 झोया अख्तर

First Published on January 13, 2019 12:31 am

Web Title: article about artists story