पंकज भोसले

डेझरी अखावन इराणी-अमेरिकी दिग्दर्शिका आहे. अभिनय आणि लेखन या गुणांसह सौंदर्यही अपरंपार लाभलेली ही विदुषी गेल्या काही वर्षांमध्ये किशोरवयीन मुला-मुलींच्या लैंगिक जाणिवांचा आणि गोंधळाचा विषय फार गांभीर्याने हाताळत आहे. ‘द स्लोप’ ही वेबसीरिज, ‘अप्रोप्रिएट बिहेवियर’ हा चित्रपट या सिनेमाध्यमाला शिकता शिकता केलेल्या प्रायोगिक कामाची दखल बऱ्यापैकी घेतली गेल्यानंतर तिने यंदा ‘मिसएज्युकेशन ऑफ कॅमरून पोस्ट’ हा आणखी एक आडवाटेचा सिनेमा तयार केला आहे. नव्वदीच्या दशकाचे विनोदकारी स्मरणरंजन हा सिने-साहित्य माध्यमांचा आवडीचा विषय बनलेला असताना लैंगिक जाणिवा गांभीर्याने पडताळणारा हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे.

यंग अ‍ॅडल्ट कादंबऱ्यांना ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’, ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ या माध्यमांतरामुळे गेल्या तीनेक वर्षांत मोठा वाचकवर्ग मिळाला आहे. एमिली डॅनफोर्थ या लेखिकेची ‘मिसएज्युकेशन ऑफ कॅमरून पोस्ट’ ही या दशकातीलच बेस्ट सेलर तरुण तुर्की कादंबरी. यात १९९३ मध्ये अमेरिकेतील छोटय़ा शहरगावात आपल्यातील समलैंगिकतेचा शोध लागलेल्या तरुणीची गोष्ट संवेदनशीलरीत्या हाताळण्यात आली आहे. चित्रपटात ती संवेदनशीलता पूर्णपणे जपत क्लोई ग्रेस मॉरेट्झ या मुख्य धारेतील अभिनेत्रीने तंतोतंत कॅमरून पोस्ट साकारली आहे.

चित्रपटाची सुरुवात १९९३ सालातील देवभाबडय़ा खेडय़ात आई-वडिलांच्या अपघातानंतर दूरच्या नातेवाईकांच्या देखरेखीखाली वाढणाऱ्या कॅमरूनच्या (क्लोई ग्रेस मॉरेट्झ) वाफाळलेल्या दिवसांना दर्शविते. ती अवघी बारा-चौदा वर्षांची आहे. तिला प्रियकर आहे, पण त्याऐवजी तिचे आकर्षण सोबत शिकणाऱ्या मुलीवर अधिक आहे. गुप्तरीत्या आपल्या या सुप्ताकर्षणाला वाट करून देताना पकडली गेल्यानंतर तिचे कर्मठ आणि चर्चप्रेमी नातेवाईक तिला ‘गॉड्स प्रॉमिस’ नामक लिंगसुधारगृहात आणून सोडतात. चर्च आणि धार्मिक संकल्पनांवर आधारित रानात हे स्वयंघोषित सुधारगृह असते. यात बहकलेल्या किंवा समलैंगिक तरुण-तरुणींना उपचार करून बरे करण्याचा दावा केला जात असतो.

कॅमरून त्या सुधारगृहात शिक्षण घेताना सुरुवातीला आणखी एकटी पडत जाते. तिथले देवभोळे आणि अभ्युपगमी उपचार, सकारात्मकता आणि पाप-पुण्याचा हिशेब वेचण्याच्या आचारांनी ती थकून जाते. ड्रग्ज, समलैंगिक भुकेच्या खुणांनी वेढलेल्या सुधारगृहातील तरुणाईची दबलेली वाफ आणखी विचित्ररीत्या बाहेर पडताना तिला दिसते.

थोडय़ाच दिवसांत हीप्पी घरात वाढलेल्या, वर हॉलीवूड अभिनेत्रीच्या नावाशी साधम्र्य असलेल्या जेन फोंडा (साशा लेन) आणि अमेरिकी रेड इंडियन वंशाच्या अ‍ॅडम (फॉरेस्ट गुडलक) या समआजारी असलेल्या सुधारगृहातील मुलांशी तिची मैत्री होते. ही दोघे सुधारगृहातील ड्रग्जची कमतरता रानांत त्याची छोटी शेती करून भागवत असतात. त्यांच्यात सामील झाल्यानंतर सुधारप्रक्रिया, सुधारणा आणि दैविक संकल्पनांकडे पाहण्याचा कॅमरूनचा नवा दृष्टिकोन तयार होतो.

चित्रपटाचा विशेष हा की इथे ही मुले देवावर, प्रार्थनेवर आणि त्यातील दांभिकतेवर चर्चा करताना दिसतात. या चर्चामधूनच त्यांची आपल्या गोंधळलेल्या लैंगिकतेची काही अंशी ओळख होते. सुधारगृहात दबलेली काही मुले आणखी भीषण परिस्थितीत जातात, तर कॅमरून, जेन आणि अ‍ॅडम आपल्या सुधारणेसाठी वेगळा मार्ग पत्करतात.

व्यसन आणि तरुणाई, स्मरणरंजनातून दिसणारी तरुणाई यांचे डॅनी बॉयल (ट्रेनस्पॉटिंग), वेस अ‍ॅण्डरसनकृत (बॉटल रॉकेट,रशमोर) सर्वोत्तम उदाहरणे एकीकडे आणि हा जवळजवळ सारख्याच घटकांना घेत भिन्न अनुभूती देणारा चित्रपट एकीकडे असे कॅमरून पोस्ट पाहताना लक्षात यायला लागते.

सुधारगृहात समलैंगिकतेचे, लिंगगोंधळाचे आणि ड्रग्ज सेवनाचे रुग्ण आहेत. त्यांच्या व्यसनावर तिरकस चर्चा आहे, पण  विनोदाऐवजी हे सारे फार गांभीर्याने सुरू राहते. येथे कॅमरून ऐकू पाहणारे आणि सुधारगृहात बंदी असलेल्या संगीताचे दाखले आहेत, तसेच अल् गोर आणि क्लिंटन यांच्या निवडणुकीच्या स्टिकर्सचाही संदर्भ आहे. पण काळाला विनोदासाठी वापरण्याचा लोकप्रिय आणि सहज मार्ग नाही. यंदा फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्सने आणलेल्या ‘एव्हरीथिंग्ज सक्स’ नावाच्या मालिकेमध्येही नव्वदीच्या दशकात अमेरिकेतील खेडय़ामध्ये आपल्या लैंगिक जाणिवांचा शोध घेणाऱ्या कॅमरूनइतक्याच वयाच्या मुलीची गोष्ट विनोदाचा आधार घेऊन साकारण्यात आली आहे. ‘मिसएज्युकेशन ऑफ कॅमरून पोस्ट’ने या विषयाला विनोदापासून लांब ठेवतानाही कुतूहलपूर्णरीत्या पडद्यावर साकारले आहे. या एकटय़ा चित्रपटाने डेझरी अखावन या नवतरुण दिग्दर्शिकेच्या कौशल्याची कल्पना येऊ शकेल. त्यानंतर तिचे आधीचे काम हुडकून काढून पाहणे अनिवार्य बाब बनलेली असेल.