रंगभूमीचं लग्न ही कल्पनाच जितकी भन्नाट आहे तितकेच एकाच नाटकात रंगभूमीचा आजवरचा सुवर्णकाळ अनुभवायला मिळणं हे ही रंजक आहे. ‘संगीत चि.सौ.कां.रंगभूमी’ नाटकाच्या दिग्दर्शिका, लेखिका आणि अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, नाटय़संपदा कलामंचचे अनंत पणशीकर, गायक-अभिनेते नचिकेत लेले, अमोल कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी, केतकी चैतन्य यांनी नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांच्याशी संगीत रंगभूमी, तरुण पिढीचं नाटकाकडे वळणं, कलेचं शास्त्र आणि शिस्त अशा विविध बाजूंवर मनसोक्त गप्पा रंगल्या..

नाटकाच्या लेखन-संकल्पनेविषयी संपदा जोगळेकर-कुलकर्णी म्हणाल्या, रंगभूमीचा संसार या नाटकात मांडला आहे. रंगभूमीचं लग्न रसिकराजाशी म्हणजेच प्रेक्षकाशी झालंय. संसारामध्ये भांडण होतं, कधी तणावाचे, कधी आनंदाचे प्रसंग तर कधी प्रणयाचेही प्रसंग येतात. नवरा-बायकोची गोष्ट बांधत बांधत नाटकात त्या त्या भावनेशी जाणारं नाटय़पद आणि नाटय़प्रवेश या नाटकात आहे. पहिल्या अंकाच्या शेवटी रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या मध्ये जी जी माध्यमं आली, ती ती माध्यमं व्यक्तिरेखा म्हणून आणली आहेत. ग्रामोफोन, रेडिओ आणि शेवटी दूरचित्रवाणी आली. दूरचित्रवाणी आल्यावर आता दोघांमध्ये घटस्फोट होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली.

१९३० ते १९६० या काळापर्यंत मध्यंतर केला आहे. नवरा बायकोचा संवाद ही काल्पनिकता पुढच्या अंकात वापरायची नाही हे डोक्यात ठेवलं होतं. मग आता त्या दोघांमध्ये समझोता व्हायला पाहिजे तर तो झाला आहे. कारण आज नाटकाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. अजूनही दोघांचा घटस्फोट झालेला नाही. त्यानंतर अगदी १९८० पर्यंत हा प्रवास आणला आहे, असं संपदा यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या की, नाटकाच्या दुसऱ्या अंकामध्ये त्या दोघांचं भांडण सोडवायला नारदमुनी येतात. मग नारद आणि रंगभूमीचं बदललेलं रूप अशा दोन व्यक्तिरेखा दिसतात. पहिल्या अंकात रंगभूमी आणि रसिकराज आणि दुसऱ्या अंकात नवी रंगभूमी आणि नारद अशी रचना आहे. शेवटी नारद रंगभूमीला म्हणतो की तुझ्यावर रसिकराजाचं प्रेम आहे. मग रंगभूमी त्याला विचारते की तो नाटकाला का येत नाही? प्रेम आहे तर नाटकं बंद का पडतात? मग नारद म्हणतीत, तू माझी परीक्षा घे, तो माझ्याजवळ तुझ्याविषयीच बोलत असतो. रंगभूमी म्हणते मग परीक्षेला सिद्ध व्हा. मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याची उत्तरं द्या. त्यानंतर तिला पटतं की रसिकराजाचं तिच्यावर प्रेम आहे. मग ती त्याला बोलवा असं सांगते. त्यामुळे त्या दोघांचं पुन्हा मीलन होतं. आणि रंगभूमीचं महत्त्व प्रेक्षकांच्या मनात कसं आहे हे अधोरेखित होतं.

नाटकाच्या नावाविषयी त्यांनी सांगितलं, नाटकाचा पडदा उघडतो तोच मुळी अांतरपाटासारखा. मग रंगभूमी आणि रसिकराजाचा विवाह होतो त्यामुळे हेच नाव सयुक्तिक ठरलं. ‘संगीत मत्स्यगंधा’ हे नाटक बसवत असताना मुळात संगीत रंगभूमी काय होती, याचा अभ्यास-संशोधन करत होते. त्यादरम्यान अनंत पणशीकर असं म्हणाले की,  रंगभूमीचा इतिहास मांडायचा झाला तरी त्याचं नाटक होईल. ते वाक्य मी मनात धरून ठेवलं. मग ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकानंतर पणशीकर यांच्या त्या वाक्याने मनात घर केलं. कारण कथ्थक सादर करायला लागल्यापासून रंगभूमी कायम एक देव आणि व्यक्ती वाटत आली आहे. जेव्हा मी समेवर उभी राहते आणि टाळ्या पडतात. तेव्हा असं वाटायचं की, माझं कुणीतरी छायाचित्र घेतंय. आणि तो देव आहे, जो मला पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देतोय. तर मी त्याला या नाटकाच्या संकल्पनेत देव न करता रंगभूमी केली. तिचं मानवीकरण केलं. पण मानवीकरण केल्यावर एका देवीची गोष्ट ऐकण्यासाठी लोकांनी यावं का.. तर या देवीला बघून अरे, ही तर मीच आहे, हिच्याही संसारात खटके उडतात, रुसवेफुगवे होतात. यांचं नवराबायकोचं नातं आमच्यासारखं आहे, असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. प्रेक्षकांशी जोडलं जाण्यासाठी ही कल्पना मला योग्य वाटली.

या नाटकात नाटय़पदं आणि गाण्यांची निवड करताना लोकप्रिय गाणी निवडण्याचा मोह झाला का, या प्रश्नावर त्यांनी सांगितलं, मोह होणं साहजिक होतं. पण गाण्यांची निवड करण्याची जबाबदारी वर्षां भावे यांच्यावर सोपविली होती. त्यांचं गाण्याविषयीचं संशोधन फार मोठं आहे. त्यांचा त्याविषयी खूप अभ्यास आहे. त्यांना सांगितलं की ही कथा आहे, हे हे प्रसंग त्यात आहेत. त्याला साजेसं कुठलं गाणं, कुठलं नाटय़पद जाऊ  शकतं ते सांगा. अशा प्रकारे मी कथा दिली, त्यांनी गाण्यांची यादी दिली. मग काही काही प्रसंग आले जसे की, गोविंदराव टेंबे यांनी पहिल्यांदा चित्रपटाला संगीत दिलं, तर हा धागा पकडून रंगभूमी त्यांच्यावर रागवू शकते असं दाखवलं की ती विचारते त्यांना, तुम्ही नाटकाबरोबरच चित्रपटाला संगीत का देता? तेव्हा ते तिला म्हणतात, अगं मी कलाकार आहे, कलाकार तोच असतो जो सगळ्यांना कवेत घेतो.

नारदमुनींची योजना कशी करण्यात आली याविषयी त्या म्हणाल्या, नारदमुनींचा तिन्ही लोकांत वावर आहे. आजवर नारदमुनी विनोदीपद्धतीने सादर झाले. पण इथे ते संवादक म्हणून येतात. नारदाची व्यक्तिरेखा भाषेच्याही बंधनात इथे अडकत नाही. ‘ती फुलराणी’ ते ‘हमीदाबाईची कोठी’पर्यंतचा काळ नाटकात नारदमुनींमुळे जोडला गेला आहे. आजच्या पिढीला फक्त परंपरा बघायला मिळणार की नवीन काही आहे? या विषयी संपदा म्हणाल्या की, एखाद्या गोष्टीचं तुम्ही सादरीकरण कसं करता त्याला महत्त्व आहे. या नाटकात नचिकेत लेले, शमिका भिडे, अवधूत, केतकी, अमोल यांचं गाणं तरुण पिढीला जोडणारं आहे. ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकालाही तरुण पिढीने आपलंसं केलं होतं. तसंच आजची पिढी या नाटकालाही आपलंसं करेल. या नाटकात गाणाऱ्या मुलांचं संगीतात शिक्षण झालंय. त्यामुळे शिस्त त्यांच्याकडे आहे. मग ते सादरीकरणातही उतरतं. सचिन गावकरचं नेपथ्य, नाटक उभं करण्यात असलेला तरुणाईचा वावर अशा सगळ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टंतून तरुणाईला जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

कलाकारांची निवड समाजमाध्यमातून

नाटकातील तरुण कलाकारांची निवड समाजमाध्यमांतून झाली. नाटक करता करता नवी पिढी घडवणं हेही या नाटकातून करता आलं. एकांकिकांमधून पुढे आलेल्या मुलांना व्यावसायिक मंच मिळवून देण्यासाठीच नाटय़संपदा कलामंच स्थापन केला आहे. या मुलांमुळेच ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. या नाटकात गाणं सादर करणाऱ्या गायकांना संगीत नाटकात आणि गाण्यातही करिअर करायचं आहे, असं अनंत पणशीकर यांनी सांगितलं. संगीत नाटकात गाताना गुरुजींची ना असायची, पण आता तसं राहिलेलं नाही. कारण तंत्रज्ञान आल्यामुळे गाताना जास्त ताण येत नाही. त्यामुळे आवाज सांभाळायला पाहिजे हे त्यांचं सांगणं योग्य होतं, असं नचिकेत लेले म्हणाला. तर जुन्या नाटकांची लय आणि आताची आपली लय साधायची आहे, हे संपदाताईने समजून सांगितल्याचं केतकी म्हणाली. संपदा कुलकर्णी यांची मुलगी शर्वरी कुलकर्णी यात ‘नव्या रंगभूमी’ची भूमिका करतेय. ती म्हणाली, आईने दिग्दर्शक म्हणून दरारा निर्माण न करता आईसारखं सांभाळून घेतलं. तिने कुटुंबासारखं नाटकाच्या चमूला बांधून ठेवलं आहे. व्यावसायिक नाटक करणं हे मला माझ्यातलं नाटय़शिक्षण अजमावून पाहण्यासारखं होतं.