भक्ती परब

‘हजारों ख्वाईशे ऐसी’ या पहिल्याच चित्रपटापासून लक्षवेधी अभिनेत्रींच्या यादीत जाऊ न बसलेल्या चित्रांगदा सिंगने बॉलीवूडमध्ये मोजकेच चित्रपट केले. ‘साहेब बीबी अँड गँगस्टर ३’ नंतर ‘बाजार’ हा या वर्षांतील तिचा दुसरा चित्रपट. ‘सूरमा’सारख्या प्रेरणादायी चित्रपटातून निर्मितीचं शिवधनुष्यही तिने पेललं. याचं श्रेय ती त्याच्या कथेलाच देते. बाजार चित्रपटानंतर तिने लगेचच एक पटकथा वाचायला घेतली आहे. त्याचबरोबर ती एका वेबसिरीजमध्येही लवकरच दिसणार आहे, या पार्श्वभूमीवर चित्रांगदाशी संवाद साधला.

मी ‘बाजार’ या चित्रपटात शकुन कोठारीच्या पत्नीची म्हणजेच मंदिराची भूमिका करतेय. सैफ अली खान शकुन कोठारीच्या भूमिकेत आहे. एका शक्तिशाली श्रीमंत व्यावसायिकाच्या पत्नीच्या भूमिकेत असल्यामुळे त्या व्यक्तिरेखेभोवती श्रीमंतीचं वलय आहे, असं चित्रांगदा म्हणाली.  सामान्य घरातून आलेल्या शकुन कोठारीला शेअर बाजारात स्वतची एकहाती सत्ता मिळवायची असते, त्यात तो यशस्वीही होतो. तो खेळीया आहे, शेअर बाजाराला आपल्या तालावर नाचवू पाहतो. अशा माणसाच्या वैवाहिक आयुष्याची बाजू काय असेल? त्या वेळी अशा व्यक्तीच्या पत्नीची भूमिका साकारताना, एका ध्येयवेडय़ा व्यक्तीसोबत संसार करणं हे सगळं त्या व्यक्तिरेखेतून मला अभिनित करायचं होतं. एकूणच या चित्रपटाविषयी सांगायचं झाल्यास यातली प्रत्येक व्यक्तिरेखा त्याला हवी तो गोष्ट मिळवण्यासाठी काय करते, कशी वागते, त्यांच्यातील नातेसंबंध कसे आहेत, प्रत्येकाचं काही एक ध्येय आहे, त्यांचं इच्छित त्यांना मिळतं का..याभोवती हा चित्रपट आहे, असं चित्रांगदा म्हणाली.

एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील स्त्रीच्या व्यक्तिरेखेत अत्यंत साधेपणा आहे, कुटुंबाविषयी आपलेपणा आहे. हे एक गुजराती कुटुंब आहे. त्यामुळे ती संस्कृती माझ्या व्यक्तिरेखेत आहे, असंही तिने सांगितलं. गुजराती भाषेतले मोजके संवादही आहेत. या चित्रपटात शेअर बाजार, पैसा अशाच गोष्टी दिसतात. मला स्वतला शेअर बाजाराची गणितं समजत नाहीत. या विषयात रस आहे, पण मी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली असल्याने या विषयाबद्दल स्वतला अपडेट ठेवते. कारण मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की शेअर बाजारातील गुंतवणूक चांगली असते. त्याचा चांगला मोबदला मिळतो, असं ती म्हणते.

चित्रांगदाने फारच निवडक चित्रपटात काम केलंय, याविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की मला ज्या चित्रपटांची विचारणा झाली त्यातील चांगले चित्रपट मी निवडले. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करतंय आणि पटकथा काय आहे. दिग्दर्शक चांगला असेल तरच चित्रपट चांगला होतो, असं चित्रांगदा मानते. निर्माता, लेखक निखिल अडवाणीला हजारो ख्वाईशे ऐसी चित्रपटात तो साहाय्यक म्हणून काम करत होता, तेव्हापासून त्याला ओखळते. आम्हाला त्यानंतर एकत्र एक चित्रपटही करायचा होता, तो योग यानिमित्ताने जुळून आल्याचं ती सांगते. गौरव चावलाचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असल्यामुळे तो खूप तयारीने सेटवर यायचा. सगळ्या गोष्टी त्याने नीट आखलेल्या असायच्या, असं तिने सांगितलं.

सध्याचं बॉलीवूडमधील चित्र आशादायी आहे हे सांगताना चित्रांगदाने राजी, अंधाधून आणि स्त्रीसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्याने आनंद झाल्याचं सांगितलं. ७० ते ८० च्या दशकात खूप चांगले चित्रपट बनायचे, पण त्यानंतर आताचा विचार करता मनोरंजक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात, असं मत चित्रांगदाने व्यक्त केलं. आता प्रेक्षकांना स्वित्झर्लँडच्या बागेत किंवा बर्फाळ प्रदेशातील गाण्याचं चित्रीकरण असं काही न आवडता आपली गोष्ट पडद्यावर बघायला आवडते आहे.

बॉलीवूडपटातून सांस्कृतिक पार्श्वभूमी नेहमीच प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट अशीच दाखवली जाते, याविषयी चित्रांगदा म्हणाली की सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे प्रेक्षक व्यक्तिरेखेशी जोडले जातात, पण ते सच्चेपणानं दाखवलं तरच प्रेक्षकांना पटतं. मी टू मोहिमेबाबतही चित्रांगदाने याआधीच आपली मतं जाहीरपणे मांडली आहेत. मात्र बॉलीवूडमधील या नकारात्मक परिस्थितीतही आपल्याला हवे तेच चित्रपट करण्याची तिची भूमिका कायम ठेवत ती टिकून राहिली हेच तिचे वैशिष्टय़ आहे.