News Flash

उत्कंठावर्धक चकवा : ‘गुमनाम है कोई!’

सुखदाश्चर्याची गोष्ट म्हणजे शिल्पा नवलकर यांनीही हे सस्पेन्स नाटक मोठय़ा ताकदीनं लिहिलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र पाथरे

मराठी रंगभूमीवर सस्पेन्स थ्रिलर अधूनमधून येत असतात. परंतु का कुणास ठाऊक, त्यांना प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. बहुधा मध्यमवर्गीय मराठी प्रेक्षकाला सामाजिक आणि कौटुंबिक नाटकांतच अधिक रस असावा. मात्र, असं असलं तरीही उत्तम सस्पेन्स नाटकं कधीमधी येत राहतातच. ‘वैशाली कॉटेज’ हे मंगेश कदम दिग्दर्शित रहस्यनाटय़ आजही अनेकांच्या स्मरणात असेल. त्यातला सस्पेन्स अंगावर भीतीचा काटा उभा करणारा होता. आता ते पुन्हा एकदा भद्रकाली प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेलं, शिल्पा नवलकरलिखित ‘गुमनाम है कोई’ हे नवं रहस्यनाटक घेऊन आले आहेत. त्यातून त्यांची या जातकुळीच्या नाटकांवरील हुकूमत पुनश्च ठळकपणे अधोरेखित झाली आहे. सुखदाश्चर्याची गोष्ट म्हणजे शिल्पा नवलकर यांनीही हे सस्पेन्स नाटक मोठय़ा ताकदीनं लिहिलं आहे.

रेवती कारखानीस ही आपल्या पहिल्याच कादंबरीमुळे प्रसिद्ध झालेली लेखिका गेली पाच वर्षे एका सस्पेन्स कादंबरीचं लेखन करण्यात गुंतलेली आहे. पण काही केल्या तिची ही कादंबरी पूर्ण होत नाहीए. बारीकसारीक तपशिलांच्या अस्सलतेबद्दल ती खूप जागरूक राहत असल्यानं हा विलंब होतो आहे. तिची लेखिका मैत्रीण विशाखा हीसुद्धा तिच्या या कादंबरीची उत्सुकतेनं वाट बघते आहे. ती अधूनमधून रेवतीकडे जात-येत असते. त्यांचं घरगुती गूळपीठ आहे. एकमेकांच्या लिखाणाबद्दल तर त्या परस्परांशी चर्चा करतातच; परंतु त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळासुद्धा आहे. रेवतीचा नवरा मिलिंद हाही मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याचीही विशाखाशी छान मैत्री आहे. रेवती-मिलिंदचा मुलगा सिद्ध शिक्षणासाठी पुण्यात असतो. रेवतीची सायकिअ‍ॅट्रिस्ट असलेली नणंद माधवी हीसुद्धा पुण्यात वास्तव्यास असल्यानं सिद्धच्या बाबतीत दोघं निर्धास्त असतात. मात्र, असं सगळं छान चाललेलं दिसत असूनही एक दिवस मात्र रेवती-मिलिंदला अक्षरश: खायला उठतो. त्या दिवशी मिलिंदचे वडील आणि मिलिंद-रेवतीची लहानगी मनाली दहा वर्षांपूर्वी घरातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू पावलेले असतात. त्यांच्या अपघाती मृत्यूचा तो काळाकुट्ट दिवस त्यांना भयंकर अस्वस्थ करतो. विशेषत: रेवतीला! ती त्या दिवसापासून आजपर्यंत त्या धक्क्य़ातून सावरलेली नाही. तिने कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट कदापि विसरू शकत नाहीए. त्या धक्क्याचा प्रचंड मानसिक ताण तिच्या मनावर अजूनही कायमच आहे.

अशात अचानक तिला तिच्या कादंबरीत खून झालेली नायिका कामिनी हिचे भास व्हायला लागतात. ती आपल्या आसपास वावरतेय.. एवढंच नव्हे तर रेवतीला ती अधूनमधून स्वच्छ समोर दिसतेही. या भासांमुळे रेवती घाबरीघुबरी होऊन असंबद्ध बडबडू लागते. कधी ती नॉर्मल असते, तर कधी अचानक कामिनी दिसल्यावर स्वत:वरील नियंत्रण ती गमावून बसते. मिलिंद आणि विशाखाचं काहीतरी ‘प्रकरण’ आहे असंही तिला हल्ली वाटू लागतं. तसंच विशाखा आपल्या कादंबरीची प्रकरणं चोरून वाचू पाहते आहे असंही तिला अलीकडे वाटू लागलं आहे. त्यातून ती एकदा संताप्त होऊन विशाखाचा जीव घ्यायचाही प्रयत्न करते. परंतु मिलिंद व सिद्ध त्यावेळी तिथं हजर असल्याने अनर्थ टळतो. दुसऱ्या दिवशी मात्र घडला प्रकार रेवतीला अजिबात आठवत नाही. ती पूर्वीच्याच मोकळिकीनं विशाखाशी बोलायला जाते. पण विशाखाला ती हे सगळं नाटक करते आहे असंच वाटतं. आपल्याला मििलदपासून दूर करण्यासाठीच रेवती स्वत:ला कसले कसले भास होत असल्याचं नाटक करत असल्याचा थेट आरोपच ती करते. परंतु रेवती तिच्या या आरोपांत काहीच तथ्य नसल्याचं सांगायचा प्रयत्न करते. भानावर नसल्याने कदाचित आपण विशाखाशी गैर वागलो असल्यास ती तिची माफीसुद्धा मागते. आपल्याला होणारे हे भास नसून खरोखरच कुणीतरी प्रत्यक्ष आपल्याला घाबरवण्यासाठी कामिनीच्या रूपात येत असावं असा रेवतीचा कयास असतो. त्यामुळे ती घरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवून घेते. तथापि रेवतीच्या म्हणण्याप्रमाणे कामिनीच्या रूपात तिला कुणीतरी घाबरवायला येत असल्याचं कसलंच फुटेज सीसीटीव्हीत मिळत नाही. मग रेवतीला होणारे हे भास खरेच भास असतात, की तिच्या मनात कामिनीसंदर्भात चाललेली उलथापालथ तिला या प्रकारे प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली दिसते? मिलिंदच्या सांगण्यावरून रेवतीची सायकिअ‍ॅट्रिस्ट नणंद माधवी तिच्यावर उपचार करायला सुरुवात करते. पण रेवतीची ही मनोरुग्णावस्था दहा वर्षांपूर्वी झालेल्या मनालीच्या क्रूर मृत्यूमुळे झालीय की रेवती या कादंबरीच्या नायिकेच्या होत असलेल्या भासांमुळे, हे रहस्य प्रत्यक्ष नाटकात उलगडताना पाहणंच उचित ठरेल.

लेखिका शिल्पा नवलकर यांनी या सस्पेन्स थ्रिलर नाटकाची रचना मोठय़ा कौशल्यानं केलेली आहे. एकीकडे मनोविश्लेषणाच्या अंगानं जातं आहे असं वाटणारं हे नाटक मधेच रेवतीला व्यक्तिगत जीवनात बसलेल्या तीव्र धक्क्य़ामुळे ती मनोरुग्णावस्थेकडे चाललीय असंही वाटत राहतं. किंवा कदाचित कादंबरी आणि व्यक्तिगत आयुष्य यांतील ताणतणावांच्या सरमिसळीतून ही गुंतागुंत निर्माण झाली आहे का, असाही प्रश्न प्रेक्षकांना  पडतो. परंतु असा कात्रजचा घाट प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून प्रत्यक्षात मात्र भलतंच वास्तव नाटकाच्या अखेरीस उलगडतं. उत्तम रहस्यनाटय़ाची ही लक्षणं आहेत. एकाच वेळी मिलिंद, विशाखा, माधवी या सगळ्यांनाच संशयाच्या भोवऱ्यात गोवून प्रत्यक्षात भलत्याच दिशेचा चकवा प्रेक्षकांच्या पदरी येतो. आणि हेच या नाटकाचं यश आहे. या चकवाचकवीच्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात लेखिका सफल झाली आहे. फक्त सुरुवातीच्या प्रस्तावनावजा दीर्घ प्रवेशाला थोडीशी कात्री लागती तर नाटकातला ठहराव जाऊन ते अधिक वेगवान झालं असतं. अर्थात ही त्रुटी प्रयोगाच्या रंजकतेला धक्का लावीत नाही. कारण त्यानंतरच्या घटना इतक्या गुंतागुंतीच्या आणि चकव्यात पाडणाऱ्या आहेत, की ही गोष्ट अलगद प्रेक्षक विसरूनही जातात. अत्यंत बांधीव असं हे रहस्यनाटय़ कलाकारांनी अधिकच सखोल केलं आहे.

दिग्दर्शक मंगेश कदम यांना रहस्यनाटय़ाची हुकमी नस सापडली आहे हे ‘गुमनाम है कोई’तून सिद्ध होतं. एकाच वेळी अनेकांकडे संशयाची सुई वळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. एकीकडे हे मनोविश्लेषणात्मक नाटक आहे की काय असं वाटत असतानाच दुसरीकडे ही थंड डोक्यानं केलेल्या एखाद्या खुनाच्या उकलीची गोष्ट आहे की काय, असाही नाटक पाहताना समज होतो. प्रत्यक्षात मात्र आपलं हे तर्कट चुकलं याचा प्रेक्षकाला आनंद होतोच; परंतु तो क्षणभर सुन्नही होतो. दिग्दर्शकानं हा सगळा वळणावाकणांचा चकवा लीलया घडवून आणला आहे. प्रदीप मुळ्ये यांनी रहस्यनाटय़ास पोषक पार्श्वभूमी पुरवणारा गॅरेज कम् बंगल्याचा आगळावेगळा सेट उभारला आहे. तसंच नाटकभर त्यांनी फूटलाइट्सच्या प्रकाशाचा वापर करून गूढ रहस्यमयतेत आणखीनच भर घातली आहे. मीरा वेलणकर (वेशभूषा) आणि सचिन वारीक (रंगभूषा) यांनीही नाटकाची जातकुळी ओळखून आपली कामगिरी चोख केली आहे. अविनाश-विश्वजीत यांचं पार्श्वसंगीत या चकव्याला उठाव देणारं आहे.

मधुरा वेलणकर यांनी रेवतीची मनोरुग्णावस्था आणि त्यातून तिच्या व्यक्तिमत्त्वात होणारे भावभावनांचे आंदोळ अतिशय उत्कटतेनं दाखवले आहेत. रेवतीची भूमिका त्या जणू जगल्या आहेत असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये. रेवतीच्या मनातील नानाविध कंगोरे, त्यातल्या अंधाऱ्या गुहा, त्यात होणाऱ्या मुक्या, विलोल हालचाली हे सारं त्यांनी समर्थपणे व्यक्त केलं आहे. मिलिंदचं वरकरणी साधं-सरळमार्गी असणं आणि तरीही त्याच्यात व विशाखात काहीतरी गुपित शिजते आहे असा भास निर्माण करण्यात अंगद म्हसकर यशस्वी झाले आहेत. विशाखाही तशीच. तिला कामिनीच्या रूपात कल्पून रेवती तिच्याशी जो खेळ खेळते, त्याने संशयाची एक सुई तिच्याकडे वळते. प्राजक्ता दातार यांनी स्वच्छ, सुस्पष्ट संवादफेकीतून आणि सहज वावरातून विशाखाला चेहरा दिला आहे. शैला काणेकर यांचं बऱ्याच खंडानंतरचं रंगमंचावर झालेलं पुनरागमन आश्वासक आहे. सायकिअ‍ॅट्रिस्ट माधवी पेशंटवर योजत असलेली थेरपी ज्या आत्मविश्वासानं त्या वागतात/ वावरतात, त्यामुळे आणि त्यांच्या देहबोलीतून दृगोचर होते. प्रत्यक्ष भावजयीवर उपचार करताना घरगुती नातेसंबंधांत राखावयाचा तोलही त्यांनी आपल्या अनौपचारिक वागण्या-बोलण्यातून राखला आहे. सिद्धच्या भूमिकेतला रोहित फाळके लोभस आहे. त्याचं ममाशी असलेलं आतडय़ाचं नातं आणि तिच्या आजारानं त्यानं भयंकर बेचैन होणं स्वाभाविक वाटतं. त्याचा उपजत साधेपणा सिद्धला गोडवा बहाल करतो.

एक उत्तम रंजक रहस्यनाटय़ पाहिल्याचं समाधान ‘गुमनाम..’ देतं यात काहीच शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 1:06 am

Web Title: article about gumnaam hai koi drama
Next Stories
1 चित्रचाहूल
2 सुबोध भावेचे  ‘काही क्षण प्रेमाचे’
3 ‘द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’: प्रोमो, ट्रेलरचे प्रदर्शन रोखण्यासाठी न्यायालयात याचिका
Just Now!
X