15 October 2019

News Flash

वेबवाला : थोडक्यात गोडी

बंगाली कलाकारांचे चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयाची एक वेगळी चुणूक जाणवत राहते.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

वेबसीरिजच्या विश्वात भारतीय सीरिजचा प्रवेश झाल्यानंतर बहुतांशपणे हिंदी वेबसीरिजची चर्चा अधिक झाली. मराठीत एकदोन सीरिज चर्चेत राहिल्या, पण देशभरात इतर भाषांमध्येदेखील वेबसीरिज साकारल्या गेल्या. झी ५ वर प्रादेशिक भाषेतील काही वेबसीरिज सध्या हिंदीतदेखील उपलब्ध आहेत. ‘काली’ (कली असादेखील उच्चार होतो) ही बंगाली भाषेतील वेबसीरिज अशाच काही चांगल्या सीरिजपैकी एक आहे. अतिशय छोटं कथानक, उत्तम चित्रीकरण, कथा संयत पण वेगवान पद्धतीने पुढे जात उत्सुकता टिकवून ठेवणारी असं बरंच काही या सीरिजमध्ये दिसते.

कलकत्त्यातील एका मध्यमवर्गीय महिलेची ही गोष्ट. नवऱ्याशी संबंध तोडल्यामुळे मुलाबरोबर एकत्र राहणारी काली हीच या गोष्टीची नायक आणि नायिका. नवऱ्याच्या अनेक गैरप्रकारांमुळेच ती त्याच्यापासून वेगळी राहत असते. मात्र दोन-चार महिन्यांतून नवरा अचानक उगवत असतो. असाच तो एके दिवशी उगवतो आणि कालीच्या आयुष्यातील दुष्टचक्राची सुरुवात होते. त्याच वेळी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलाला अपघात होतो, त्याच्या शस्त्रक्रियेसाठी सहा लाख रुपये हवे असतात. तर अचानक घरी आलेल्या नवऱ्याला त्याच्या सहकाऱ्याच्या खुनाचा संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेले असते. मात्र त्याने कालीच्या घरातच चोरून आणलेले अमली पदार्थ लपवलेले असतात. त्यातून कालीला मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळवण्याची शक्यता असते, मात्र त्यासाठी अमली पदार्थाच्या तस्करांकडे जाणे गरजेचे असते. त्यातून मग आणखीनच गुंतागुंत वाढत जाते. टोळ्यांमधील वैमनस्य, अमली पदार्थाच्या व्यापाराची व्याप्ती, त्यातील भ्रष्टाचार असे अनेक पदर उलगडत मालिका आणखीनच एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन धडकते. हा टप्पा काहीसा फिल्मी वाटावा असा असला तरी एकूणच गोष्टीत तो रंगत आणतो आणि पुढील सीझनचे सूतोवाचदेखील करतो.

बंगाली चित्रपट क्षेत्राचा स्वतंत्र असा एक ठसा आपल्याकडे आहे. त्यात होणारे प्रयोग, तेथील दर्जेदार अभिनेते यांची एक मोठी फौजच आहे. केवळ मनोरंजनासाठी वाट्टेल ते या सदरातील दाक्षिण्यात्यांपेक्षा तेथील कलाविश्व समृद्ध आहे आणि ते प्रयोगशील आहे. या सर्वाचे एक उत्तम प्रतिबिंब काली या वेबसीरिजमध्ये उमटताना दिसते.

कथा तशी मर्यादित अवकाशात सुरू होते, मात्र नंतर तिचा परीघ इतका वाढत जातो की तो केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा भाग उरत नाही. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेली कथानकं पाहिली जातातच, पण येथे कथेला दिलेले वळण हे खूप सहजसुंदर आहे त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता अधिक टिकते.

वेबसीरिज या सदरात मोडणाऱ्या अनेक मालिका सध्या थोडक्या खर्चात कसं जमवून न्यायचं याचं गणित मांडताना अनेक वेळा कथेला पूर्ण न्याय देत नाहीत. पण कालीमध्ये बाह्यचित्रीकरणाची वेगवेगळी स्थळं आणि एकूणच तो माहोल, त्यासाठी करावा लागलेला खटाटोप हे सारे खूप प्रभावीपणे येते. विशेष म्हणजे या संपूर्ण मालिकेत कॅमेरा खूपच बोलक्या पद्धतीने सारे टिपताना दिसतो. प्रादेशिक वेबसीरिजमध्ये अशा बाबींना तुलनेने कमी महत्त्व मिळत असते. येथे मात्र निर्मिती प्रक्रिया उत्तम राखण्याकडे कल दिसून येतो.

बंगाली कलाकारांचे चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयाची एक वेगळी चुणूक जाणवत राहते. तशी चुणूक येथे इतर पात्रांपेक्षा कथेचा नायक असणाऱ्या नायिकेमध्ये दिसून येते. एक सर्वसामान्य स्त्री अशा प्रसंगातून जाताना कशी कठोरपणे वागते, धाडसी जिवावर बेतणारे निर्णय घेते हे सारे मुख्य कलाकाराने व्यवस्थित उतरवले आहे.

अर्थात हा मालिकेचा पहिलाच सीझन आहे. कथानकाच्या अखेरीस पुढच्या सीझनचे सूतोवाच अगदी थेटपणे केलेले आहे. त्यामुळे पुढील सीझनची प्रतीक्षा, उत्सुकता नक्कीच राहणार.

काली

सीझन पहिला

ऑनलाइन अ‍ॅप – झी ५

First Published on January 13, 2019 12:28 am

Web Title: article about kali web series