सुहास जोशी

‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ ही उक्ती शब्दश: जगणारा एक प्रचंड मोठा वर्ग आपल्याकडे आहे. पण त्याच वेळी आपण काही तरी नवीन करू शकतो, त्यातून भविष्याची चिंता कमी होऊ  शकते, असा विचार करणारादेखील एक वर्ग अस्तित्वात असतो. असे दोन घटक जेव्हा एकमेकासमोर उभे ठाकतात तेव्हा संघर्ष अटळ असतो. आणि ही परिस्थिती रिलेशनशिपमध्ये (म्हणजे आजच्या भाषेत बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड) निर्माण झाली असेल तर आणखीनच खडाखडी होण्याचा संभव असतो. आजच्या काळाच्या पाश्र्वभूमीवर तर त्यात आणखीनच वेगळे कंगोरे सापडतात. असं बरंच काही दाखवायचा प्रयत्न लिटल थिंग्ज या हिंदी मिश्रित इंग्रजी वेबसिरिजच्या दुसऱ्या भागात दिसतो, पण तो तितकासा ठसत नाही. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतला आनंद मांडणारी ही वेबसीरिज पहिल्या सीझनमध्ये ज्या पद्धतीने व्यक्त होते, त्यातली मजा दुसऱ्या सीझनमध्ये गडबडून जाते.

ही गोष्ट आहे काव्या (मिथिला पालकर) आणि ध्रृव (ध्रृव सेहगल) या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची. काव्या ही नागपुरातून मुंबईत आलेली, तर ध्रृव दिल्लीहून. काव्या तिच्या करिअरबद्दल, भविष्याबद्दल चांगलीच महत्त्वाकांक्षी आणि बरीच व्यवहारी विचार करणारी तर तुलनेने ध्रृव हा वर्तमानातील छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधणारा. पण तरीदेखील ते एकत्र आलेले असतात. त्यातच काव्याला बढती मिळते आणि ध्रृव नोकरी सोडतो. परिणाम ठरलेलाच. पहिल्या सीझनमध्ये छोटय़ा छोटय़ा गोष्टीतला आनंद मांडून झाल्यावर पुढच्या टप्प्यावर हा आनंदच धुसमुशीचे कारण ठरू लागतो. सभोवतालची परिस्थिती त्यात आणखीनच भर घालू लागते. आणि मग गोष्ट नेहमीच्या वळणाने जात राहते.

गोष्ट सांगायची तर ती इतकीच छोटी आहे. सीरिजच्या नावाप्रमाणेच. सत्तर-ऐंशीच्या दशकात मध्यमवर्गीयांची गोष्ट मांडणारे असे काही चित्रपट आपण पाहिलेच आहेत. तसाच काहीसा हा प्रकार आहे, फरक इतकाच की या वेबसीरिजमध्ये ही गोष्ट मध्यमवर्गीयांच्या आणि उच्च मध्यमवर्गीयांमधल्या टप्प्यावर घडते. आणि आजच्या काळातील असल्यामुळे त्याला लिव्ह इन रिलेशनशिपचा मुकुट चढवला आहे.

या कथेत काय असायला पाहिजे होते यापेक्षा जे मांडलंय त्यावर बोलायचं तर ही सिरीज शब्दबंबाळ आहे. शेवटून दुसऱ्या भागात तर दृश्य न पाहता केवळ संवाद ऐकले तरी चालू शकेल. दृक्श्राव्य माध्यम असताना सारं काही संवादातूनच सांगावं लागणं हे खटकणारं आहे. दोन्ही पात्रांची व्यक्तिरेखा, त्यातील तणाव मांडतानाचे प्रसंग मात्र नेमके निवडले आहेत. याबद्दल लेखकाचे कौतुक करायला हवे. पण आठ भागात हे सर्व पाहायला लागणे कंटाळवाणे ठरू शकते. (त्यातला त्यात काव्याच्या आईचा मुंबई दर्शन भाग जरा हवापालट करणारा आहे.) खरं तर दीड एक तासाच्या चित्रपटाची कथा असावी इतकाच याचा जीव आहे.

मिथिला पारकर ही तिच्या आधीच्या सीरिजपेक्षा यामध्ये खूपच आत्मविश्वासाने वावरताना दिसते. काव्याच्या पात्रासाठी तिची निवड उत्तम आहे. ध्रृवची (हा स्वत: या सीरिजचा लेखकदेखील आहे.) भूमिकादेखील चांगली झाली आहे. किंबहुना सर्वच कलाकारांनी चांगले काम केले आहे. पण कथेच्या रचनेतच काही मूलभूत बदल अपेक्षित होते. भाषा, वेशभूषा, सेट अशा काही माध्यमातून कथेला वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न सीरिजकर्त्यांनी केला आहे, पण एकूणच सुवर्णमध्य साधायच्या प्रयत्नात गडबड झाली आहे. आणि मुळात अगदीच मर्यादित स्वरूपात वास्तव मुद्दय़ांना हात घालायचा प्रयत्न होतो.

या सीरिजचा पहिला सीझन हा डाइस मीडियाने युटय़ूबवर प्रदर्शित केला होता. तर दुसरा सीझन नेटफ्लिक्सने. नेटफ्लिक्सच्या माध्यमामुळे सीरिजच्या निर्मितीप्रक्रियेत बऱ्याच सुधारणा दिसून येतात. मुख्यत: पहिल्या सीझनमध्ये झालेली वेगवेगळ्या अ‍ॅपची इन-फिल्म जाहिरात बरीच कमी होते. तरीदेखील हे इन-फिल्म ब्रॅण्डिगचे प्रकरण जरा त्रासदायकच आहे. असे जरी असले तरी एका बाबतीत मात्र या सीरिजची नोंद घ्यावी लागेल, ती म्हणजे यानिमित्ताने नेटफ्लिक्सने हिंद वेबसीरिजमध्ये वेगळ्या विषयाला वाव दिला हे नक्की.

-लिटिल थिंग्ज

सीझन – दुसरा

ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स